रस्त्यावरील खड्डे अजूनही कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 22:15 IST2018-02-16T22:14:48+5:302018-02-16T22:15:34+5:30
अमरावती जिल्ह्यातील व विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते खड्डेमुक्त झाल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

रस्त्यावरील खड्डे अजूनही कायम
आॅनलाईन लोकमत
चांदूरबाजार : अमरावती जिल्ह्यातील व विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते खड्डेमुक्त झाल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. चांदूरबाजार-वलगाव-अमरावती मार्गातील खड्डे मात्र आजही अपघाताला आमंत्रण देत आहेत.
चांदूरबाजार-अमरावती वलगाव मार्गे हा जिल्ह्यातील सर्वांत जुना सार्वजनिक बांधकाम विभागाचा मार्ग आहे. याच मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालयसुद्धा आहे. त्यांच्या कार्यालयापासून दोन-तीन किलोमीटरवरच मोठमोठे खड्डे पडलेले आहे. तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येत नसल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच या रस्त्यावर मुक्ताई लॉनजवळ टाटा समूह व काळी-पिवळई एकमेकांवर धडकून अपघात झालेला आहे. त्याच ठिकाणी हे खड्डे पडलेले आहे. हा अपघात या खड्ड्यामुळे तर घडला नाही ना, असेही वाहनचालकांमध्ये चर्चा होत आहे. कारण या रस्त्यावरील खड्डे हे मोठमोठे आहे आणि खड्डे वाचविण्याचा प्रयत्न प्रत्येक वाहन चालक करीत असतो व रात्रीच्या वेळी पुढील वाहन हे किती दूर आहे, याचा अंदाज व्यक्त होत नसल्याने रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात बरेच अपघात होतात.
चांदूरबाजार ते खरवाडीपर्यंतच्या रस्त्यावर अनेक मोठमोठे खड्डे आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात रात्रंदिवस वाहतूक सुरू राहते. मोठ्या वाहनाबरोबर मोटारसायकल चालकांनादेखील खड्डे चकुविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते.
खड्ड्यांमुळे लहान-मोठे अपघात कित्येकदा होतात. हा मार्ग चांदूरबाजार सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येतो.
थातूरमातूर बुजविले खड्डे
राज्याच्या बांधकाममंत्र्यांनी विभागातील रस्ते खड्डेमुक्त झाल्याची घोषणा केली असतानाही चांदूरबाजार सार्वजनिक बांधकाम उपविभाग झोपेत आहे. तालुक्यातील काही रस्त्यांवरील खड्डे कायमच आहेत, तर काही रस्त्यावरील खड्डे हे थातूरमातूर बुजविल्याने ते पुन्हा उखडण्यास सुरुवात झाली असल्याचे प्रवासी व वाहनचालकांमध्ये चर्चा रंगू लागली आहे.
ब्रिटिशकालीन रस्ता
गॅजेटमध्ये ब्रिटिशांच्या राजवटीत हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाचाच होता, असा उल्लेख आहे. या मार्गावर दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात निंबाची झाडे लावल्याचा उल्लेख त्यात केलेला आहे. आघाडी शासन असताना तत्कालीन पालकमंत्री वसुधा देशमुख यांच्या कार्यकाळात या मार्गाचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्यात आले होते.