तोडफोडीनंतर मध्यरात्री मृतदेहाचे शवविच्छेदन
By Admin | Updated: November 4, 2014 22:32 IST2014-11-04T22:32:37+5:302014-11-04T22:32:37+5:30
सोमवारी रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान संतापलेल्या नातेवाईकांनी पारश्री हॉस्पिटलची प्रचंड तोडफोड केल्यानंतर मृत मुनिफा बी मोहमद हनिफ (६०) यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करु देणार नाही,

तोडफोडीनंतर मध्यरात्री मृतदेहाचे शवविच्छेदन
अमरावती : सोमवारी रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान संतापलेल्या नातेवाईकांनी पारश्री हॉस्पिटलची प्रचंड तोडफोड केल्यानंतर मृत मुनिफा बी मोहमद हनिफ (६०) यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करु देणार नाही, असा पावित्रा घेतला होता. मात्र लोकप्रतिनिधी व मुस्लिम समाजाच्या धर्मगुरुंनी मृताच्या नातेवाईकांची समजूत काढल्यावर तणाव निवळला आणि मध्यरात्री मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेची तक्रार पारश्री रुग्णालयांच्या संचालकांनी मंगळवारी रात्री ९ वाजतादरम्यान दाखल केली.
जमील कॉलनी परिसरातील रहिवासी मुनिफा बी मोहमद हनिफ (६०) यांना १६ आॅक्टोबर रोजी पारश्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सोमवारी ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. घरी नेताच त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना पुन्हा पारश्री रुग्णालयात आणण्यात आले. मात्र तपासणीअंती मुनिफा बी यांना डॉक्टराने मृत घोषित केले. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांचा संताप अनावर झाला. मृताच्या नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड सुरु केली. रुग्णालयातील डॉक्टरांचे कक्ष व आतील काचांची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे खापर्डे बगिच्या परिसरात तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी रुग्णालयीन परिसरात तगडा बंदोबस्त ठेवला होता.