गौण खनिज तस्करांच्या ताब्यात
By Admin | Updated: December 29, 2014 02:58 IST2014-12-29T02:58:30+5:302014-12-29T02:58:30+5:30
तालुक्यातील नदी-नाल्याचे पात्र सध्या गौण खनिज तस्करांच्या ताब्यात असून अवैध उत्खनन करून वाहतूक करणाऱ्यांना तलाठी पकडत असताना ...

गौण खनिज तस्करांच्या ताब्यात
श्यामकांत पाण्डेय धारणी
तालुक्यातील नदी-नाल्याचे पात्र सध्या गौण खनिज तस्करांच्या ताब्यात असून अवैध उत्खनन करून वाहतूक करणाऱ्यांना तलाठी पकडत असताना ‘साहेबांच्या’ तोंडी आदेशाने सोडावे लागत असल्याचा अफलातून प्रकार सुरू आहे. तस्करांचे पूर्वीच साहेबांशी झालेल्या ‘सेटिंग’मुळे कनिष्ठ कर्मचारी रेती तस्करांना बेडी घालण्यास हतबल असल्याचे चित्र आहे.
सध्या तालुक्यात रेती उत्खनन व वाहतूक बंद आहे. नवीन लिलाव प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सध्या रेतीवरील निर्बंध कायमच आहे. मात्र तालुक्यात २ हजार झोपडपट्टी, शेकडो पक्के घराचे बांधकाम, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनातील रपटे व पुलाचे बांधकाम, ठक्करबाप्पा योजनेचे सिमेंट काँक्रीट रस्ता व नाल्यांचे बांधकाम, बीआरजीएफचे काँक्रीट रस्त्यांचे बांधकाम युद्धस्तरावर सुरू आहे. या कामात रेती, डब्बर व मुरुमाचे मोठ्या प्रमाणावर वापर सुरू आहे. परंतु कोणताही अधिकृत वाहतूक परवाना नसताना धडाक्याने अवैधरीत्या रात्रीच्या पाळीत रेतीची वाहतूक सुरू आहे.
धारणी शहरातील मोठमोठे बांधकामावर मध्यरात्री चोरट्या मार्गाने रेती येत आहे. बांधकामस्थळी रेतीची मोठमोठी ढिगारे लागली असून याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष चर्चिले जात आहे. आलेल्या रेतीची कोणतीच चौकशी होत नसल्याने शासनाला दररोज हजारो रूपयाचा महसुलापासून वंचित राहावे लागत आहे. याकडे तलाठ्याकडून एसडीओपर्यंत सर्वांचे कमालीचे दुर्लक्षच कारणीभूत ठरत आहे.
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत मोठ्या प्रमाणावर रेती व मुरूमाचा वापर सुरू आहे. मात्र गौण खनिज वाहून नेत असताना पकडण्यात आलेल्या वाहनाला सोडण्याचे फर्मान वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळत असल्याने कनिष्ठ कर्मचारी हतबल झाले आहेत. एकीकडे बैठकीत गौण खनिज चोरी पकडण्याचे फर्मान देणारेच नंतर पकडलेल्या वाहनावर कार्यवाही करू नका सोडून द्या अशा तोंडी आदेश मिळत असल्याने तलाठ्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे.