राजापेठ पोलीस ठाण्यातील वृक्षांवर पोपटांची शाळा
By Admin | Updated: May 21, 2016 23:58 IST2016-05-21T23:58:12+5:302016-05-21T23:58:12+5:30
राजापेठ पोलीस ठाण्यातील वृक्षांवर दररोज सायंकाळी पोपटाची शाळाच भरते.

राजापेठ पोलीस ठाण्यातील वृक्षांवर पोपटांची शाळा
नागरिकांमध्ये उत्सुकता : शहराच्या चारही दिशेने उतरतात थवेच्या थवे
वैभव बाबरेकर अमरावती
राजापेठ पोलीस ठाण्यातील वृक्षांवर दररोज सायंकाळी पोपटाची शाळाच भरते. शहराच्या चारही बाजूने तेथील वृक्षांवर पोपटाचे थवेच्या थवे उतरत असल्यामुळे हा क्षण बघण्यासाठी नागरिकांमध्येही उत्सुकता दिसून येत आहे.
बहुतांश पक्ष्यांच्या प्रजाती या जंगलातील अधिवास करतात. सर्वसाधारण दिसणारे काही पक्षीच शहरी वस्त्यांमध्ये आढळून येतात. साधारणत: पक्ष्यांची नियमित दिनचर्येत पहाटेपासून सायंकाळपर्यंत राहते. पहाटेपासून ते अन्नाच्या शोधात निघतात. या वृक्षावरून त्या वृक्षावर फिरून फळामधून ते भूक भागवितात. त्यानंतर रात्र होण्यापूर्वीच ते आपआपल्या अधिवासात परत येतात. ही बाब नियमितपणे सुरू असल्यामुळे ते जेथून परत गेलेत त्याच ठिकाणी परत येतात. यामध्ये पोपटांचाही सहभाग आहे. पोपट हा बोलका पक्षी असल्यामुळे अनेक नागरिक त्याला पिजऱ्यांत ठेवतात. पक्ष्यांना पिजऱ्यांत ठेवणे गुन्हा आहे. मात्र आजही अनेकांच्या घरी पोपट बंदीस्त असल्याचे आढळतात. पोपटांची राजापेठ ठाण्याच्या वृक्षावर जणू शाळाच भरते. सायंकाळ होताच शहराच्या चारही बाजूने पोपटाचे थवेच्या थवेच राजापेठ ठाण्यातील वृक्षावर उतरतात. पोपटाचा एकच किलबिलाट सायंकाळी होतो. यावेळी तब्बल ३ ते ४ हजार पोपटांचा किलबिलाट वृक्षावर असतो. वर्षानुवर्षे हे पोपट परंपरागत वृक्षावर अधिवास करीत आहेत. त्यामुळे त्यांची दिनचर्या तेथूनच सुरू होते. राजापेठ पोलीस ठाणे हे नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळते. पक्ष्यांनाही ही जागा सुरक्षित वाटणे हे एक आश्यर्चच म्हणावे लागेल.
मध्यवस्तीत असणाऱ्या राजापेठ ठाण्याच्या परिसरात सतत नागरिकांची वर्दळ असते. तरीसुद्धा या लोकगर्दीत पक्ष्याला सुरक्षिततेची जाणीव होते, हे नवलच आहे. पक्षी अभ्यासक जयंत वडतकर यांच्या मते पोपट हे पक्षी विविध वृक्षांच्या ढोलीत घरटे करतात. मात्र, ते केवळ ढोलात अंडी देण्यापुरते वास्तव्यास असतात. त्यांची दिनचर्या ही वृक्षावरच असते. दिवसभर विविध वृक्षांवरच अन्न शोधणे व रात्रीला परत मूळ वास्तव्यातील वृक्षाच्या फाद्यांवर झोपणे हीच त्यांची दिनचर्या.
राजापेठ ठाण्यासह हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील वृक्षांवरही सर्वाधिक पोपट राहतात. या दोनच ठिकाणी सर्वाधिक पोपटाचे अधिवास असल्याचे आढळून आले आहे.
पोपट या पक्ष्याची दिनचर्या वृक्षांवरच असते, वृक्षांच्या ढोलीत अंडी देण्यापुरते ते राहतात. त्यानंतर अन्नाचा शोध घेणे आणि पुन्हा मूळ अधिवास असणाऱ्या वृक्षावर रात्र काढणे ही त्यांची नियमित दिनचर्या असते. शहरातील राजापेठ ठाणे व हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील वृक्षांवर हजारो पोपटांचा अधिवास पहावयास मिळत आहे.
- जयंत वडतकर,
मानद वन्यजीव रक्षक.