१२ तासांच्या पावसाने महापालिका प्रशासनाची पोलखोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:18 IST2021-09-08T04:18:30+5:302021-09-08T04:18:30+5:30
अमरावती : गत १२ तासांत कोसळलेल्या मुसळधार पावसाने शहरात प्रचंड नुकसान झाले आहे. व्यापारी संकुल आणि झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरले, ...

१२ तासांच्या पावसाने महापालिका प्रशासनाची पोलखोल
अमरावती : गत १२ तासांत कोसळलेल्या मुसळधार पावसाने शहरात प्रचंड नुकसान झाले आहे. व्यापारी संकुल आणि झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरले, तर शहरातील मुख्य मार्गावर पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. गणेशमूर्ती पाण्यात भिजल्याने मुर्तिकारांचे आर्थिक नुकसान झाले आहे. मंगळवारी पहाटे शहरात पाणीच पाणी असे चित्र अनुभवता आले.
सोमवारी सायंकाळी ६ नंतर सुरू झालेला पाऊस मंगळवारी पहाटेपर्यंत सुरूच होता. रात्रभर जोराचा पाऊस पडला. परिणामी बडनेरा नवीवस्ती स्थित बालाजीनगर चक्क पाण्याखाली आले होते. अमरावती येथील जयस्तंभ चौक, राजकमल चौक, नमुना, इर्विन चौक, रेल्वे स्थानक चौक येथील व्यापारी संकुलाच्या गाळ्यात पावसाचे पाणी शिरले. बहुतांश व्यावसायिकांचे साहित्य, मोबाईल, किराणा माल भिजल्याने आर्थिक फटका बसला. पाणी कोसळल्यानंतर आऊटलेट नसल्याने हा प्रकार घडला, असे चित्र आहे. शहरातील विलानगर, यशाेदानगर, संजय गांधीनगर, मायानगर, वडाळी या भागात पावसाचा फटका बसला. नाल्याच्या काठावरील वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने तारांबळ उडाली, हे विशेष. एकूणच १२ तास कोसळलेल्या पावसाने महापालिका प्रशासनाची पोलखोल उघड केली.
------------------
राजापेठ उड्डाणपुलाचे पासवे पाण्यात
नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरले
व्यापारी संकुलात पाणी घुसल्याने नुकसान
गणेश मूर्ती पाण्याखाली, मूर्तिकारांना आर्थिक फटका
बडनेरातील बालाजीनगर पाण्यात
शहरात काही रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक खोळंबली