कोरोनाबाधित असताना विरोधकांकडून राजकारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:24 IST2021-02-05T05:24:11+5:302021-02-05T05:24:11+5:30
फोटो पी २५ दयार्पूर दर्यापूर : मला व माझ्या नगराध्यक्ष पत्नीला कोरोना झाला असताना, विरोधकांनी राजकारण करून भाजपच्या ...

कोरोनाबाधित असताना विरोधकांकडून राजकारण
फोटो पी २५ दयार्पूर
दर्यापूर : मला व माझ्या नगराध्यक्ष पत्नीला कोरोना झाला असताना, विरोधकांनी राजकारण करून भाजपच्या कार्यकाळात निधी मंजूर करून बांधण्यात आलेल्या नगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारती उद्घाटन केले व श्रेय घेण्याचा प्रयत्न केला, अशी टीका अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी येथे केली. नगराध्यक्ष नलिनी भारसाकळे यांचा सोमवारी नगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीमध्ये पदग्रहण समारंभ पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर खा. नवनीत राणा, माजी पालकमंत्री तथा आ. प्रवीण पोटे, माजी आ. रमेश बुंदिले, भाजप जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी, रवींद्र नळकांडे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब वानखडे, प्रदीप मलिये उपस्थित होते. दर्यापूर शहर व मतदार संघाचा विकास भाजपच्या कार्यकाळात झाला असून १३०० कोटींचा निधी भाजपच्या कार्यकाळात उपलब्ध झाला. पैकी ५० कोटींपेक्षा अधिकचे विकासात्मक कामे विद्यमान नगराध्यक्षांनी खेचून आणल्याचे ते म्हणाले. सूत्रसंचालन सारंगा धर्माधिकारी, प्रास्ताविक गिरिधर बोरखडे तर आभार जयंत वाकोडे यांनी मानले.
तीन पायाचे सरकार
तीन पायाच्या महाविकास आघाडीच्या सरकारचा पायपोस कुणाच्या पायात आहे, हे कळत नाही. सरकार के व्हापर्यंत टिकेल, हे माहित नाही. एकमेकांचे कपडे ओढण्यातच त्यांचा वेळ जात आहे, अशी टिका माजी पालकमंत्री प्रविण पोटे यांनी केली. आपण पालकमंत्री असताना प्रथमच जिल्ह्यात २२ हजार कोटींचा निधी आणल्याचे ते म्हणाले. खासदार नवनीत राणा यांनी केंद्रीय मंत्री व्हावे, पण युवा स्वाभिमानीचे नव्हे तर भारतीय जनता पक्षातून, असा चिमटा काढताच उपस्थितांमध्ये खसखस पिकली.
श्रेय लाटणे चुकीचे
नगराध्यक्षा नलिनी भारसाकळे यांच्या प्रयत्नामुळेच नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीकरीता निधी आला. ते काम पुर्णत्वास गेले. मात्र काँग्रेसवाले त्यांनी न केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहे. चुकीच्या पद्धतीने उद्घाटनही केले होते, हा प्रकार चुकीचा असल्याची टिका खासदार नवनीत राणा यांनी केली.