महिला उमेदवारांच्या शोधासाठी राजकीय पक्षांची कसरत
By Admin | Updated: August 5, 2016 00:13 IST2016-08-05T00:13:44+5:302016-08-05T00:13:44+5:30
डिसेंबर महिन्यात होऊ घातलेल्या जिल्ह्यातील ९ नगरपरिषदांच्या आगामी निवडणुकीत ५० टक्के जागांवर महिला उमेदवारांना संधी मिळणार आहे.

महिला उमेदवारांच्या शोधासाठी राजकीय पक्षांची कसरत
यजमानांद्वारेच ब्रांडिंग : अभ्यासू महिलांना मिळावी संधी
जितेंद्र दखने अमरावती
डिसेंबर महिन्यात होऊ घातलेल्या जिल्ह्यातील ९ नगरपरिषदांच्या आगामी निवडणुकीत ५० टक्के जागांवर महिला उमेदवारांना संधी मिळणार आहे. मात्र, सर्व पक्षांमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग अत्यल्प आहे. राजकीय पक्षांच्या महिला आघाडी व्यतिरिक्त अन्यत्र महिला मुख्य प्रवाहात नाहीत. म्हणून यावेळी निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांना राजकीयदृष्ट्या सक्षम, अभ्यासू व धाडसी महिला उमेदवार शोधण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.
५० टक्के जागा राखीव असल्याने मागील निवडणुकीत ज्या महिलांना संधी मिळाली होती त्यापैकी अभ्यासू महिला नगरसेविका बोटावर मोजण्याइतक्याच आहेत. सभागृहामध्ये साडेचार वर्षे पुरुषप्रधान संस्कृतीचाच बोलबाला राहिला आहे. वारंवार हे चित्र समोरही आले. यामुळे ५० टक्के आरक्षण देण्यामागचा शासनाचा हेतू अद्यापही साध्य झालेला नाही.
महिला आरक्षणाचे संकेत
लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी महिला राखीव आरक्षण निघाल्यास नगरपालिकेत महिलांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक होणार आहे. असे असल्यास राजकीय पक्षांकडून काय भूमिका घेतली जाते याबाबत उत्सुकता आहे.
महिला उपेक्षित
प्रमुख राजकीय पक्षांमध्ये अभ्यासू व धाडसी महिला असल्या तरी त्या पाठबळाअभावी अपेक्षित आहेत. महिला नगरसेवकांना त्यांचे पतीराजच पुढे आणत नसल्याचे जाणवते. केवळ निवडणुकीच्या प्रचारातच त्यांना समोर आणले जाते असा सूर आहे.