दुय्यम निबंधकाविरुद्ध राजकीय पक्ष एकवटले
By Admin | Updated: March 18, 2016 00:21 IST2016-03-18T00:21:53+5:302016-03-18T00:21:53+5:30
सहदुय्यम निबंधकाने पत्रकारांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा मुद्दा आता चांगलाच तापला असून निबंधकाला अटक करून त्याच्यावर निलंबनाची कारवाई करावी,

दुय्यम निबंधकाविरुद्ध राजकीय पक्ष एकवटले
‘अॅट्रॉसिटी’ दाखल करा : आंदोलनाचा इशारा
सुनील देशपांडे अचलपूर
सहदुय्यम निबंधकाने पत्रकारांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा मुद्दा आता चांगलाच तापला असून निबंधकाला अटक करून त्याच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी आरपीआय (आ.), रिपाइं (ग), मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपा इत्यादी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी केली असून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
येथील परवानाधारक मुद्रांक विक्रेता व तहसील कार्यालयानजीकच्या संगणक व झेरॉक्स व्यावसायिकांमधील वादावर सहदुय्यम निबंधक अर्जुन बडधे यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी पत्रकारद्वय राज इंगळे व आशीष गवई गेले असता त्यांना बडधे यांनी अश्लील शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली होती. यासंदर्भात ११ मार्च रोजी पोलीस स्टेशनला तक्रारही देण्यात आली होती. बडधे यांना त्वरित अटक करून निलंबित करावे, या मागणीसाठी अचलपूर-परतवाड्यातील पत्रकार आता आक्रमक झाले आहेत.
अॅट्रॉसिटी अॅक्ट लावण्याची मागणी
सहदुय्यम निबंधकांची प्रतिक्रिया घेण्यासाठी गेलेले राज इंगळे व आशिष गवई हे दोन्ही पत्रकार दलित असल्यामुळे निबंधक बडधे यांनी त्यांना अपमानास्पद वागणूक दिली.
बडधे या पत्रकारांना आधीच ओळखत होते. त्यामुळे त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा आरपीआय (आठवले) जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गवई, आरपीआय (गवई) शहराध्यक्ष किशोर मोहोड यांनी निवासी जिल्हाधिकारी मोहन पातुरकर यांना दिला आहे.
विविध राजकीय पक्षांचा इशारा
दरम्यान मनसेचे तालुका अध्यक्ष प्रितेश अवघड व शहराध्यक्ष विवेक महल्ले यांनीही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन दुय्यम निबंधक बडधे यांच्या निलंबनाची मागणी आठवड्याच्या आत पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. पत्रकारांच्या मागणीला शिवसेना शहरप्रमुख विनय चतूर, प्रहारचे सुधाकर सावरकर, माजी उपनगराध्यक्ष नरेंद्र फिसके, महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष वर्षा हिरुळकर, भाजपचे स्थानिक नेते श्रीधर क्षीरसागर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा माधुरी शिंगणे, माजी नगरसेविका संगीता भोंडे, सामाजिक कार्यकर्ते मनीष लाडोळे आदींनी समर्थन दिले आहे. मंगळवारी दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन पोलीस उपनिरीक्षक ब्राह्मणे व सहकारी स्वप्निल तंवर यांनी घटनास्थळ बघून पंचनामा केला.
हा जामीनपात्र गुन्हा असल्यामुळे बडधे यांना अटक करण्यात आलेली नाही. सात वर्षाच्या आत गुन्ह्याची सजा असल्यास समजपत्र देऊ शकतो. पण, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास तात्पुरती अटक करण्यात येते.
- नरेंद्र ठाकरे (ठाणेदार), अचलपूर पोलीस स्टेशन.