गुडेवारांच्या बदलीचे राजकारण निषेधार्ह
By Admin | Updated: May 14, 2016 00:02 IST2016-05-14T00:02:50+5:302016-05-14T00:02:50+5:30
महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या बदलीच्या संदर्भात महापालिकेसह राजकारणातील सर्व विरोधक

गुडेवारांच्या बदलीचे राजकारण निषेधार्ह
शहर भाजप : ‘बंद’ जनहितविरोधी
अमरावती : महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या बदलीच्या संदर्भात महापालिकेसह राजकारणातील सर्व विरोधक एकत्र येऊन भाजपला बदनाम करण्याचा व राजकीय पोळी शेकण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. असा आरोप शहर भाजपने केला आहे.
मनपातील सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व काही विविध गटांचे नगरसेवक एकत्र येऊन गुडेवार यांच्या कथित बदलीचे राजकारण करीत आहेत. आपली बदली होणार, हे संकेत स्वत:च गुडेवार यांनी प्रसार माध्यमांना दिले. त्यानंतर शहरातील व्यवहार ठप्प करून दोन दिवसांपासून शहराला वेठीस धरले जात आहे. ‘अमरावती बंद’ जनहिताच्या विरोधात असल्याने या आंदोलनालाही आपला विरोध असल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे.
गुडेवार यांची बदली झाली की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही. अधिकाऱ्यांच्या बदल्या होणे, ही प्रशासनातील नियमित बाब आहे. त्यासाठी राजकारण होणे दुर्र्दैवी आहे. गुडेवारांच्या बदलीचा आडोसा घेऊन पालकमंत्री आणि आ. सुनील देशमुख यांच्यावर नाहक शिंतोडे उडवले जात आहेत. महापालिका निवडणुकीतील भाजपच्या आव्हानाला धास्तावलेल्यांनी हा प्रचार चालविल्याचे भाजपचे म्हणणे आहे.
भाजपचे शहर-जिल्हा अध्यक्ष जयंत डेहनकर, जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, रवींद्र खांडेकर, किरण महल्ले, मनपा गटनेता संजय अग्रवाल, सरचिटणीस चेतन गावंडे, अनिल आसलकर, महिला आघाडी अध्यक्ष रिता मोकलकर यांनी या राजकारणाचा निषेध केला आहे.