भरधाव कारने उडविल्याने पोलिसाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 22:18 IST2018-02-18T22:17:56+5:302018-02-18T22:18:17+5:30
इविनिंग वॉक करताना अचानक भरधाव वाहनाने उडविल्याने एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. संजय विष्णुजी वानखडे (५०,रा.चैतन्य कॉलनी) असे मृत पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे.

भरधाव कारने उडविल्याने पोलिसाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : इविनिंग वॉक करताना अचानक भरधाव वाहनाने उडविल्याने एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. संजय विष्णुजी वानखडे (५०,रा.चैतन्य कॉलनी) असे मृत पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. शनिवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली. या घटनेमुळे पोलीस वर्तुळात शोककळा पसरली.
संजय वानखडे हे पोलीस आयुक्तालयातील मोटार वाहन विभागात चालक पदावर होते. ते दररोज इविनिंग वॉकसाठी राष्ट्रीय महामार्गावर जात होते. शनिवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास ते इविनिंग वॉक करण्यासाठी गेले. रस्त्यालगच्या किनाऱ्यावरून ते पायी चालत असताना अचानक एमएच ३४-एएम-७७९७ या क्रमाकांच्या कारने त्यांना उडविले. धडक इतकी गंभीर होती की संजय वानखडे १५ ते २० फुट उंचीवर फेकले गेले आणि पुन्हा कारवर येऊन आदळले. काही नागरिकांनी त्यांना गंभीर अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. संजय वानखडेंच्या मृतदेहाचे जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.