डिझेलची रक्कम थकल्याने पोलिसांची वाहने थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:14 IST2021-03-17T04:14:08+5:302021-03-17T04:14:08+5:30
वरुड : रक्कम थकल्याने पेट्रोलपंप चालकाने डिझेल देणे बंद केले. परिणामी, येथील पोलिसांच्या वाहनांची चाके थांबली आहेत. त्याचा दुष्परिणाम ...

डिझेलची रक्कम थकल्याने पोलिसांची वाहने थांबली
वरुड : रक्कम थकल्याने पेट्रोलपंप चालकाने डिझेल देणे बंद केले. परिणामी, येथील पोलिसांच्या वाहनांची चाके थांबली आहेत. त्याचा दुष्परिणाम गस्त व तपासावर होऊ लागला आहे. अनेक वर्षांत पहिल्यांदाच पोलिसांची वाहने थांबली आहेत.
अडीच लाख नागरिकांची सुरक्षा करण्यासाठी तालुक्यात वरुड, शेंदूरजनाघाट व बेनोडा ही तीन पोलीस ठाणी आहेत. वरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत आमनेर, राजूराबाजार, चांदस वाठोडा, देऊतवाडा, लिंगा, जरुड ही मोठ्या लोकसंख्येची आणि संवेदनशील गावे येतात. वरुड पोलीस ठाण्याला नागपूर जिल्ह्याची सीमा आहे. तर शेंदूरजनाघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेंदूरजनाघाट शहर, मलकापूर, पुसलासह सातपुडा पर्वतालगतची आदिवासी बहुल गावे आहेत. तेथे मध्य प्रदेशची मुलताई आणि पांढुर्णा सीमा येते. बेनोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेनोडासह लोणी, सावंगा, मांगरूळी पेठ ही गावे येतात. तिन्ही पोलीस ठाणे संवेदनशील आहेत. मात्र, पेट्रोल पंप चालकांची लाखो रुपयांची देयके थकीत झाल्याने त्यांनी डिझेल देणे बंद केले. यामुळे पोलीस वाहनांची चाके थांबली असून याचा परिणाम गस्त आणि तपासावर होत आहे.
एक महिन्यापासून डिझेल देणे बंद
फेब्रुवारी २०२० पासून तर जानेवारी २०२१ पर्यंत पोलीस वाहनांकरिता देण्यात येणाऱ्या डिझेलची रक्कम पोलीस प्रशासनाकडे थकली आहे. पाठपुरावा केल्याने मध्यंतरी ५० हजार रुपये मिळाले. परंतु अंदाजे १२ लाख रुपये थकीत आहेत. १ फेब्रुवारीपासून पोलिसांच्या वाहनांकरिता डिझेलपुरवठा बंद केला असल्याचे यावलकर पेट्रोल पंपचे संचालक रविकांत यावलकर यांनी सांगितले.