महापालिकेतील पोलीस पथक 'विड्रॉल'
By Admin | Updated: March 12, 2016 00:06 IST2016-03-12T00:06:44+5:302016-03-12T00:06:44+5:30
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाला सुरक्षा प्रदान करणारे शहर पोलीस आयुक्तालयातील पथक 'विड्रॉल' करण्यात आले.

महापालिकेतील पोलीस पथक 'विड्रॉल'
एक कोटीचे वेतन थकीत : पोलीस विभागाकडून पत्र
अमरावती : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाला सुरक्षा प्रदान करणारे शहर पोलीस आयुक्तालयातील पथक 'विड्रॉल' करण्यात आले. सुरक्षा देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे एक कोटीचे वेतन थकीत असल्यामुळे हा निर्णय पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक यांनी घेतला. यासंदर्भात पोलीस विभागाकडून महापालिका प्रशासनाला पत्र पाठविण्यात आले .
शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविताना महापालिका कर्मचाऱ्यांशी अतिक्रमित हुज्जत घालतात. त्यामुळे अतिक्रमण काढताना पोलीस संरक्षण हवे अशी, मागणी महापालिका वारंवार होत असते. महापालिकेच्या मागणीनुसार पोलीस कर्मचाऱ्यांना वेळोवेळी पाठविण्यात येते. याकरिता पोलिसांना महापालिकेकडून वेतन देण्यात येते. मागील काही वर्षांत महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. मात्र, या पोलिसांचे ८० लाखांचे वेतन थकीत होते. त्यातच जानेवारी २०१५ पासून महापालिकेला एक स्वतंत्र पोलीस पथक देण्यात आले. त्यांचेही ४० लाखांचे वेतन महापालिकेने दिले नव्हते. या स्वतंत्र पथकात एपीआय खराटे यांच्यासह १२ पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. या थकबाकीपैकी महापालिकेने पोलीस विभागाला २० लाखांची रक्कम दिली आहे. मात्र, तरीसुध्दा एक कोटींच्या जवळपास वेतन थकीत असल्याचे पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
यासंदर्भात पोलीस आयुक्तांनी महापालिकेला पत्र पाठविले असून सद्यस्थितीत महापालिकेतील पोलीस पथक विड्रॉल केले आहे. मात्र, महापालिकेच्या मागणीनुसार वेळोवेळी पोलीस सरंक्षण दिले जाणार आहे. (प्रतिनिधी)