विजयाच्या जल्लोषात पोलिसांची आडकाठी

By Admin | Updated: February 16, 2015 00:18 IST2015-02-16T00:18:54+5:302015-02-16T00:18:54+5:30

क्रिकेट विश्वचषकात पारंपारिक प्रतिद्वंद्वी पाकिस्तानचा भारताने पराभव करताच क्रिकेटप्रेमी नागरिक, शिवसेना आणि काही सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी राजकमल चौकात जल्लोष केला.

Police Strike in Victory | विजयाच्या जल्लोषात पोलिसांची आडकाठी

विजयाच्या जल्लोषात पोलिसांची आडकाठी

अमरावती : क्रिकेट विश्वचषकात पारंपारिक प्रतिद्वंद्वी पाकिस्तानचा भारताने पराभव करताच क्रिकेटप्रेमी नागरिक, शिवसेना आणि काही सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी राजकमल चौकात जल्लोष केला. परंतु मिष्ठान्नाचे वाटप सुरू असतानाच पोलिसांनी या क्रिकेटप्रेमींना तेथून हुसकावून लावले.त्यामुळे काही काळ वातावरण तणावसदृश झाले होते. या कारवाईने नागरिकांच्या आनंदावर विरजण पडल्याने पोलिसांविरूध्द रोष निर्माण झाला होता. काहींनी तर चक्क ‘पोलीस मुर्दाबाद’च्या घोषणा देखील दिल्या. देशभरात भारताच्या विजयाचा जल्लोष सुरू असताना शहरात मात्र पोलिसांनी आडकाठी केली. ही घटना सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.
पोलिसांची अरेरावी
अमरावती : सध्या देशावरच नव्हे तर जगावर क्रिकेटचा ज्वर चढलाय. विश्वचषकातील सर्वाधिक आकर्षण असते ते भारतविरूध्द पाकिस्तान या सामन्याचे. भारताने विश्वचषकात पाकिस्तानला हरविण्याची परंपरा कायम ठेवल्याने देशभक्त क्रिकेटप्रेमींचा उत्साह ओसंडून वाहत होता. सामना संपताच क्रिकेटप्रेमी नागरिक व सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी राजकमल चौकात ढोल ताशांच्या गजरात जल्लोष साजरा करण्यास सुरूवात केली. काही चिमुकले देखील हाती तिरंगे झेंडे घेऊन सहभागी झाले होते. या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना थांबवून मिष्ठान्नांचे वाटप करण्यात आले. यावेळी राजकमल चौकातील वाहतूक सिग्नल बंद होते. शिवाय रविवारचा दिवस असल्याने वाहतुकही फारशी नसल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.
जल्लोष सुरू होऊन अवघी १५ मिनिटे होत नाहीत तोच कोतवाली पोलिसांचा ताफा राजकमल चौकात पोहोचला. पोलिसांनी उत्साहात नाचणाऱ्या तरूणांना अडविले. इतकेच नव्हे तर ढोल-ताशे वाजविण्यासही मज्जाव केला आणि त्यांना चौकातून हुसकावून लावले. त्यामुळे क्रिकेटप्रेमी नागरिकांची पोलिसांसोबत वादावादी झाली. बँड वादकाला पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्यामुळे वातावरण अधिकच तापले.
पोलीस निघून गेल्यानंतर तेथे उपस्थित काही तरूणांनी ‘पोलीस मुर्दाबाद’च्या घोषणा दिल्यात. तूर्तास याप्रकरणी कोणावरही गुन्हे नोंदविण्यात आले नव्हते.

Web Title: Police Strike in Victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.