भाजपाच्या ‘बेशरम’ आंदोलनाला पोलिसांचा अटकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:36 IST2020-12-11T04:36:45+5:302020-12-11T04:36:45+5:30
फोटो पी ०८ बीजेपी फोल्डर चांदूर बाजार : राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याविरोधात स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी बेशरम आंदोलन जाहीर ...

भाजपाच्या ‘बेशरम’ आंदोलनाला पोलिसांचा अटकाव
फोटो पी ०८ बीजेपी फोल्डर
चांदूर बाजार : राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याविरोधात स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी बेशरम आंदोलन जाहीर केले होते. मात्र पोलिसांनी बेलोराच्या पाच किलोमीटरपूर्वीच आंदोलनकर्त्यांना अटकाव केल्याने पूर्णा मध्यम प्रकल्प कार्यालय परिसरात आंदोलनकर्त्यांनी बेशरमचे झाड लावून आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी शेकडो भाजप कार्यकर्त्यांना अटक केली.
राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू हे शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ दिल्लीला गेल्याने निषेध म्हणून बेलोरा येथे बेशरमचे झाड लावण्यासाठी भाजपा कार्यकर्ते एकवटू लागले होते. स्थानिक भाजप कार्यालयातून निघालेली कार्यकर्त्यांची रॅली शिवाजी चौक, नेताजी चौक मार्गे बेलोरा मार्गावरील पूर्णा मध्यम प्रकल्प जवळ आली. भाजपच्या आंदोलनाला पाहता पोलिसांनी बेलोरा व कुरळ पूर्णा येथे बच्चू कडू यांच्या गावी चोख बंदोबस्त लावला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी पोपट अबदगिरे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सुनील किनगे, सहायक पोलीस निरीक्षक पंकज दाभाडे यांनी बेलोरा व कुरळ पूर्णा येथील गावात शिरण्याचे संपूर्ण रस्ते सील केले होते. यामुळे भाजप कार्यकर्त्यांना बेलोरा जाण्यापासून रोखून ठेवण्यात आले.
पोलिसांनी बॅरिकेड लावून बेलोरा गावाच्या पाच किलोमीटरपूर्वीच पूर्णा मध्यम प्रकल्प कार्यालयाजवळ आंदोलनकर्त्यांना अडविले. यावेळी भाजप कार्यकर्ते व पोलिसांची बाचाबाची झाली. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक करण्याचा पवित्र घेतल्याने अखेर पूर्णा मध्यम प्रकल्प कार्यालय परिसरातच बेशरमचे झाड लावण्याचा निर्णय घेतला. आंदोलनकर्त्यांनी बेशरमचे झाड तेथे लावताच पोलिसांनी भाजपाच्या शेकडो कार्यकर्त्यांना अटक केली. यावेळी जिल्हाध्यक्ष निवेदिता दिघडे, तालुकाध्यक्ष मुरली माकोडे, अमरावती शहराध्यक्ष किरण पातुरकर, नगरसेवक गोपाल तिरमारे, टिकू अहिर, सुरेश वानखडे, भाजयुमोचे आशिष कोरडे, गजानन राऊत, गजानन देशमुख, बाळासाहेब सोनार, अतुल बनसोड उपस्थित होते.
म्हणून सीमा सील
बेलोरा व कुरळ पूर्णा येथे भाजप कार्यकर्ते बेशरम लावण्यास येत असल्याने संतापलेले बेलोरा व कुरळ पूर्णा येथील प्रहार कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने एकत्रित झाले होते. भाजप कार्यकर्ते बेलोरा व कुरळ पूर्णा येथे गेले असता, अनुचित प्रकार घडण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलिसांनी गावबाहेरचे संपूर्ण रस्ते वाहतुकीसाठी बंद केले होते.
-------