पोलिसांना मुभा तर सामान्यांकडून दंड वसूल
By Admin | Updated: August 14, 2015 00:59 IST2015-08-14T00:59:42+5:302015-08-14T00:59:42+5:30
'राँग साईड'ने वाहतूक करणाऱ्या वाहनाधारकांवर पोलीस कारवाई करतात. मात्र, पोलीस विभागातील कर्मचारी वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत असतानाही त्यांना मुभा देण्यात येत आहे.

पोलिसांना मुभा तर सामान्यांकडून दंड वसूल
वाहतूक पोलिसांचा प्रताप : पेट्रोलपंपजवळील वळणावर कारवाई
अमरावती : 'राँग साईड'ने वाहतूक करणाऱ्या वाहनाधारकांवर पोलीस कारवाई करतात. मात्र, पोलीस विभागातील कर्मचारी वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत असतानाही त्यांना मुभा देण्यात येत आहे. हा प्रकार पोलीस मुख्यालयाजवळील पोलीस पेट्रोलपंपकडे जाणाऱ्या वाहनचालकासोबत घडत आहे.
शहरातील वाहतूक सुरळीत करण्याकरिता पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर प्रयत्नशील आहे. जनसामान्यांसाठी जो कायदा लागू आहे, तोच शासकीय कर्मचाऱ्यांनासुध्दा लागू होतो. मात्र, पोलीस पेट्रोलपंप म्हणून प्रख्यात असणाऱ्या पोलीस मुख्यालयाजवळील पेट्रोलपंप टी-पॉर्इंटवर असल्यामुळे अनेक वाहनधारक विरुध्द दिशेने वाहन घेऊन पेट्रोलपंपावर जात आहेत. हे नियमांचे उल्लंघन आहे, अशा वाहनाधारकांवर कारवाई करण्याचे कर्तव्य वाहतूक शाखा पार पाडत आहेत. मात्र, केवळ सामान्य नागरिकांच्या वाहनांनाच हा नियम लागू होतो का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुख्यालयाकडून व बसस्थानकाकडून पेट्रोल भरण्याकरिता बहुतांश वाहने विरुध्द दिशेने जातात. त्या टी-पॉर्इंटवर दररोज पोलीस कर्मचारी तैनात असतात. मात्र, सामान्य नागरिक दिसताच वाहतूक पोलीस हात दाखवून थांबवतात. त्यांची चौकशी करून कागदपत्रे तपासण्यात येते. ते नसल्यास दंडात्मक कारवाईसुध्दा करण्यात येते. अनेकजण सोडण्यासाठी हात जोडून वाहन विनंती करतात. मात्र, तेथे कर्तव्यदक्ष राहून पोलीस कारवाई करताना आढळतात. एखादा पोलीस कर्मचारी राँग साईडने पेट्रोल भरण्याकरिता जात असला तरीही वाहतूक पोलीस त्यांना थांबवताना दिसले नाहीत. त्यामुळे वाहतुकीचे नियम जनसामान्यांसाठीच आहे का, असा प्रश्न वाहनधारकांना भेडसावत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष वेधण्याची गरज असल्याचे जनसामान्यांचे मत आहे.