रामपुरी कॅम्पमध्ये पोलिसांवर दगडफेक
By Admin | Updated: October 27, 2014 22:28 IST2014-10-27T22:28:35+5:302014-10-27T22:28:35+5:30
दिवाळीच्या दिवशी रामपुरी कॅम्प परिसरात अज्ञात युवकांची दुचाकी जाळण्याचा प्रकार घडला. त्या अनुषंगाने या भागात पोलीस गस्त वाढविण्यात आली होती. मात्र, रविवारी रात्री गस्तीवर असणाऱ्या

रामपुरी कॅम्पमध्ये पोलिसांवर दगडफेक
अमरावती : दिवाळीच्या दिवशी रामपुरी कॅम्प परिसरात अज्ञात युवकांची दुचाकी जाळण्याचा प्रकार घडला. त्या अनुषंगाने या भागात पोलीस गस्त वाढविण्यात आली होती. मात्र, रविवारी रात्री गस्तीवर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर लुल्ला लाईनमध्ये दगडफेक करण्यात आली. या घटनेत पोलिसांनी चार आरोपींना ंअटक केली असून १० ते १२ आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
महेश चोहितराम जीवतानी (४५), विक्की चंद्रलाल बत्रा (३६), मुकेश चोहितराम जीवतानी(४१) व जय चंद्रलाल शर्मा असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दिवाळीच्या दिवशी रामपुरी कॅम्प परिसरातील नागरिक फटाक्यांची आतषबाजी करीत असताना अज्ञात दुचाकीस्वारांनी परिसरातील एका मुलीची छेड काढली होती. त्यावरुन तेथील काही नागरिकांनी त्या दोन युवकांना मारहाण करुन पळवून लावले व या युवकांची दुचाकी नागरिकांनी जाळल्याची चर्चा परिसरात सुरु होती. या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी तीन आरोपींना अटक करुन ३० ते ३५ जणांविरुध्द गुन्हा दाखल केला होता.
घटनेच्या अनुषंगाने रामपुरी कॅम्प परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र रविवारी रात्री ११ वाजताच्या दरम्यान रामपुरी कॅम्प परिसरातील लुल्ला लाईनमध्ये पोलीस कर्मचारी विशाल ज्ञानेश्वर खानंदे व त्यांचे सहकारी गस्तीवर असताना आरोपी महेश जीवतानी, विक्की बत्रा, मुकेश जीवतानी, जय शर्मा यांच्यासह १० ते १२ नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक केली.
याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून १० ते १२ आरोपींविरुध्द भादंविच्या कलम १४३, ३५३, ३३६, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पठाण करीत आहेत.