६० गावांना मिळणार सक्षम पोलीस पाटील

By Admin | Updated: October 10, 2015 00:38 IST2015-10-10T00:38:40+5:302015-10-10T00:38:40+5:30

शासनाच्या निर्देशाप्रमाणे प्रशासनाने आपले धोरण राबविले तर सर्वसामान्य माणसांना न्याय मिळू शकतो, हे पोलीस पाटील ....

Police patrol will get 60 villages | ६० गावांना मिळणार सक्षम पोलीस पाटील

६० गावांना मिळणार सक्षम पोलीस पाटील

पारदर्शक परीक्षा : गरीब, हुशार तरुणांना संधी
धामणगाव रेल्वे : शासनाच्या निर्देशाप्रमाणे प्रशासनाने आपले धोरण राबविले तर सर्वसामान्य माणसांना न्याय मिळू शकतो, हे पोलीस पाटील पदाच्या अलीकडेच झालेल्या परीक्षेवरून पहायला मिळते़ ८४ पैकी ६० गावातील गरीब, होतकरू, हुशार, युवक, युवती या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. पोलीस पाटीलपद भरणे म्हणजे ‘वशिलेगिरी’ या शब्दालाच चांदूररेल्वे उपविभागात लगाम बसला आहे़ पारदर्शकपणे परीक्षा घेतल्यामुळे आपल्याला पुढील काळात संधी मिळणार, याचा आनंद हलाखीच्या परिस्थितीत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तरूणांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे़
गावातील अत्यंत महत्त्वाचे, मानाचे आणि तेवढ्याच जबाबदारीचे पद म्हणजे पोलीस पाटील. गावातील हालचालींमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका असते़ आजही गावात दोन कुटुंबात वाद झाल्यास पोलीस पाटलाला बोलावून मध्यस्थी केली जाते़ सर्वसामान्यांचा आधारवड म्हणजे पोलीस पाटील अशीच त्यांची प्रतिमा आहे.महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानात पोलीस पाटलाची महत्त्वाची भूमिका असते. या पार्श्वभूमिवर तालुक्यातील तब्बल ८४ गावांतील पोलीस पाटीलपदे अनेक वर्षांपासून रिक्त होती़ त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता.
विभागीय आयुक्त व जिल्हाप्रशासनाकडूनपरवानगी मिळाल्यानंतर उपविभागीय अधिकारी नितीन व्यवहारे यांनी पदभरती प्रक्रियेला सुरूवात केली़ संबंधित गावात आरक्षित पदाप्रमाणे जाहीरनामा लावण्यात आले. तब्बल ८०६ उमेदवारांनी या परीक्षेकरिता अर्ज सादर केलेत़ त्यांना परीक्षेचा प्रवेशपत्र पाठवून ४ आॅक्टोबर रोजी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत तब्बल १२१ विद्यार्थी उर्तीण झाले आहेत़
गुरूवारी चांदूररेल्वे, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर या तहसील कार्यालयात पहिल्या तीन गुणवंतांची यादी लावण्यात आली़ विशेषत: पोलीस पाटीलपदावर अनेकांची नजर असताना गावातील शेतात राब-राब राबणाऱ्या आणि अभ्यासात हुशार असणाऱ्या गरीब मुलामुलींची नावे यादीत झळकलीत. सायंकाळी आपले नाव या यादीत असल्याचे पाहून त्यांना आर्श्चयाचा धक्का बसला. एकीकडे भ्रष्टाचार व वशिलेगिरीमुळे कोणत्याही उमेदवारांचा नंबर या यादीत लागणे कठीण असल्याचा ठाम समज काही जणांचा असताना परीक्षेसाठी घेतलेले अथक परिश्रम त्यांच्या नजरेतून झळकत होते़ महसूल प्रशासनाने पारदर्शकपणे घेतलेल्या पोलीस पाटीलपदाच्या परीक्षेचे समाधान त्यांच्या चेहेऱ्यावर दिसून येत होते.
जिल्ह्यात पोलीस पाटील पदे भरताना विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी विशेष लक्ष दिले़ पारदर्शक परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाल्याचे उपविभागीय अधिकारी नितीन व्यवहारे यांनी सांगितले़ उर्वरित २४ गावांतील पोलीस पाटील पदे वरिष्ठ प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे भरण्यात येतील, असे व्यवहारे म्हणाले़

Web Title: Police patrol will get 60 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.