पोलीस कर्मचाऱ्याच्या त्रासाने विवाहितेने घेतले जाळून
By Admin | Updated: July 13, 2015 00:32 IST2015-07-13T00:32:00+5:302015-07-13T00:32:00+5:30
चौकशीकरिता गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने मानसिक दडपण आणल्याने हर्षाने स्वत:ला जाळून घेतल्याचा आरोप मृताच्या भावाने केला आहे.

पोलीस कर्मचाऱ्याच्या त्रासाने विवाहितेने घेतले जाळून
भावाचा आरोप : एसपींंचे कारवाईचे आश्वासन
चांदूरबाजार : चौकशीकरिता गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने मानसिक दडपण आणल्याने हर्षाने स्वत:ला जाळून घेतल्याचा आरोप मृताच्या भावाने केला आहे. पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी मध्यस्थी करून दोषी कर्मचाऱ्याची चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन नातेवाईकांना दिल्यावरच तणाव निवळला. त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.
९ जुलै रोजी हर्षा मदन तिखिले (३१, रा.शिक्षक कॉलनी, चांदूरबाजार) हिने संतोष ईश्वरदास डिठोर (२२, मोचीपुरा) याच्याविरुध्द घरात घुसून गळा दाबून ७ हजारांचा मोबाईल चोरुन नेल्याची तक्रार केली होती.
आरोपींना पोलीस कोठडी
चांदूरबाजार : या तक्रारीवरुन पोलिसांनी वैद्यकीय तपासणी नंतर आरोपी संतोष विरुध्द भादंविच्या कलम ४५२, ३९४ नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी तपास प्रभारी ठाणेदार शिवचरण पेठे यांनी सुरु केला होता.
तपासानंतर आरोपीला अटक करुन १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मात्र, शनिवारी दुपारी ४ वाजता सुमारास तक्रारकर्ता महिला हर्षाचे बयाण नोंदविण्याकरिता पोलीस शिपाई संजय इंगळे यांच्यासह दोन पोलीस कर्मचारी शिक्षक कॉलनी येथील हर्षा यांच्या राहत्या घरी गेले. त्यानंतर हर्षाने स्वत:ला जाळून घेतल्याची घटना घडली. तिला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेले असता मृत घोषित केले. मात्र, माझ्या बहिणीच्या मृत्यूला पोलीस कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप मृतकाचा भाऊ सुनील दिनकर राऊत (४९, रा. साईनगर अमरावती) यांनी पोलीसात दिलेल्या तक्रारीत केला आहे. रविवारी हर्षाचे शवविच्छेदनावेळी भावाने आक्रमक पावित्रा घेऊन त्या दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.
जोपर्यंत संबंधीत पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई होत नाही, तो पर्यंत मृतदेहाचे शवविच्छेदन होऊ देणार नाही. असा पावित्रा उचलला. मृताच्या भावाने पोलीस ठाणे गाठून संबधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची तक्रार नोदंविली. त्यामुळे ठाण्यात नातेवाईकाची एकच गर्दी केली होती. अखेर पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी स्व:ता दखल घेत नातेवाईकांना आश्वासन दिल्यावर नातेवाईकांनी शवविच्छेदन करू दिले. विशेष म्हणजे पोलीस कर्मचारी जेव्हा चौकशी साठी हर्षाचे घरी गेले तेव्हा सोबत महिला पोलीस कर्मचारी नव्हती हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. वृत्त लिहिस्तोवर प्रेताची शितगृहात हलविण्याची प्रक्रिया मृतकाचे नातेवाईक एसडीपीओ बाळकृष्ण पौनीकर व तहसीलदार सै. नदाफ यांचे कडून राबविली जात होती.(ता. प्रतिनिधी)