पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना ‘अच्छे दिन’
By Admin | Updated: August 10, 2015 00:04 IST2015-08-10T00:04:56+5:302015-08-10T00:04:56+5:30
राज्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना गणेशोत्सव, ईद, नवरात्र, दिवाळी, राजकीय स्तरावरील महत्त्वाच्या व्यक्तींची ...

पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना ‘अच्छे दिन’
साप्ताहिक सुटीचा मोबदला : दैनिक भत्त्यात वाढ
सुरेश सवळे चांदूरबाजार
राज्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना गणेशोत्सव, ईद, नवरात्र, दिवाळी, राजकीय स्तरावरील महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा व्यवस्था, राज्यात विविध शहरांत भेट देणाऱ्या व्हीआयपी बंदोबस्तासह आदी कारणास्तव बंदोबस्ताकरिता कर्तव्याचा कालावधी हा बऱ्याचदा १२ तासांचा अथवा त्यापेक्षा जास्त काळ बंदोबस्तात घालवावा लागतो. अपुऱ्या मनुष्यबळामुळे राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द केल्या जातात. आता त्यांना साप्ताहिक सुटीच्या मोबदल्यात देण्यात येणाऱ्या भत्त्यामध्ये वाढ करणारा निर्णय शासनाच्या गृह विभागाने ६ आॅगस्ट रोजी एका आदेशान्वये घेतला आहे.
राज्यातील वाढती लोकसंख्या, वाढते शहरीकरण, औद्योगिक भरभराट तसेच विविध धार्मिक उत्सव, सणासह आदी बऱ्याच सांस्कृतिक, राजकीय, विविध समाजाचे सांस्कृतिक कार्यक्रम, महापुरूषांच्या जयंती, अनुचित घटना घडल्यास ठेवण्यात आलेला बंदोबस्त पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना या कामाकरिता कर्तव्य बजवावी लागतात. त्यामुळे १२ तास अथवा त्यापेक्षाही जास्त काळ पोलीस कर्मचाऱ्यांना बंदोबस्त करावा लागतो. अनेक वेळा त्यांच्या सुट्या रद्द केल्या जातात. गृहविभागाच्या २० जुलै २००४ च्या आदेशान्वये पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुटीच्या मोबदल्यात वेतनश्रेणीनुसार दैनिक भत्ता अल्प अल्प प्रमाणात दिला जातो. त्यामुळे कोणतीही सुधारणा झालेली नाही. त्याकरिता आता शासनाने त्यात सुधारणा करून दैनिक भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
साप्ताहिक सुटीच्या मोबदल्यात एका दिवसाचे वेतन (मूळ वेतन अधिक भत्ते) दैनिक भत्ता म्हणून देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे एका दिवसाचे वेतन दैनिक भत्ता म्हणून देण्यास साप्ताहिक सुटीची कमाल मर्यादा एका कॅलेंडर वर्षात ८ दिवस इतकी असेल.