पोलिसांनीच कुरतडले खबर्‍यांचे ‘जाळे’!

By Admin | Updated: July 13, 2014 00:57 IST2014-07-13T00:57:05+5:302014-07-13T00:57:05+5:30

नगरसेवक अजय रामटेके यांच्यावर सशस्त्र टोळीने केलेल्या पूर्वनियोजित हल्ल्याच्या निमित्ताने पोलिसांची गुप्तचर यंत्रणा कमकुवत झाल्याचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.

Police 'nets' nets | पोलिसांनीच कुरतडले खबर्‍यांचे ‘जाळे’!

पोलिसांनीच कुरतडले खबर्‍यांचे ‘जाळे’!

अकोला: नगरसेवक अजय रामटेके यांच्यावर सशस्त्र टोळीने केलेल्या पूर्वनियोजित हल्ल्याच्या निमित्ताने पोलिसांची गुप्तचर यंत्रणा कमकुवत झाल्याचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. इच्छाशक्ती नसणे, पैशांची चणचण, जनसंपर्काचा अभाव, अधिकार्‍यांचे पाठबळ न मिळणे, बदली प्रक्रियेतील चुका आणि समन्वयाच्या अभावामुळे अकोला पोलिसांचे खबर्‍यांचे जाळे दिवसेंदिवस कमकुवत होत असल्याचे जाणकारांचे मत आहे. संवेदनशील असलेल्या अकोला जिल्ह्यात गुप्तचर यंत्रणा प्रभावी असणे आवश्यक आहे. मोठी घटना घडण्यापूर्वी पोलिसांना पूर्वसूचना अथवा माहिती मिळणे गरजेचे आहे. जिल्ह्याला लागून असलेल्या मध्य प्रदेशातून गुंडांच्या टोळ्यांकडून अकोल्यात देशी कट्टे, पिस्तूल, गांजा, ब्राऊन शुगरची विक्री केली जाते. गुन्हेगारी जगतावर वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी टोळ्या सशस्त्र हत्याकांड घडवून आणत आहेत. तसेच नागरिकांमध्ये दहशत निर्माण होण्यासाठी या टोळ्या भरदिवसा हल्ले करीत आहेत. त्यामुळे गुन्हेगारीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या घटना टाळण्यासाठी आणि गुंडांना वेळीच जेरबंद करण्यासाठी पोलिसांना या टोळ्यांच्या हालचालीची माहिती मिळणे आवश्यक आहे. यासाठी पोलिसांची गुप्तचर यंत्रणा सक्षम असणे गरजेचे आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खबर्‍याचे जाळे विणण्यासाठी पोलिसांना अनेक आघाड्यांवर काम करावे लागते. पैसा हे खबर्‍यांना जवळ करण्याचे सर्वात प्रभावी माध्यम. प्रत्येक खबर्‍याचा खर्च, खबर्‍या अडचणीत असल्यास प्रसंगी त्याच्या कुटुंबाचा खर्च करावा लागतो. खबर्‍यांसाठी अथवा गोपनीय माहिती प्राप्त करून घेण्यासाठी पोलिस प्रशासन ह्यसोर्स फंडाह्णतून पैसे देते. मात्र हे पैसे अत्यल्प स्वरूपात असतात. याचा परिणाम खबर्‍यांचे जाळे विणण्यावर होत आहे. भयमुक्त अकोल्यासाठी पोलिस प्रशासनाला गुप्तचर यंत्रणा सक्षम करावी लागणार आहे, असे जाणकारांचे मत आहे.

** बदल्यांमध्ये हवी सुसूत्रता

दरवर्षी पोलिस कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात येतात. शहरात खबर्‍यांचे जाळे असलेल्या कर्मचार्‍यांची ग्रामीण भागात बदली करण्यात येते. अशा कर्मचार्‍यांना बदली झालेल्या तालुक्याची, परिसराची माहिती नसते. त्यामुळे अधिकार्‍यांनी कर्मचार्‍यांची बदली करताना गुप्तचर यंत्रणा सक्षम कशी होईल, या अनुषंगाने विचार करावा, असा सूरही आता आवळला जात आहे.

** कर्मचार्‍यांना हवे अधिकार्‍यांचे पाठबळ

खबर्‍यांचे जाळे घट्ट करण्यासाठी पोलिसांना गुन्हेगारी जगतामध्ये वावरावे लागते. बहुतांश प्रकरणात गुंडांची माहिती गुंडांकडूनच मिळत असते. त्यामुळे पोलिस कर्मचार्‍यांना गुंडांच्या संपर्कात राहवे लागते. अशावेळी गुंडांच्या संपर्कात राहत असल्याने काही कर्मचार्‍यांना अधिकार्‍यांकडून कारवाईची भीती वाटते. तसेच खबर्‍यांचे जाळे असलेल्या अनेक कर्मचार्‍यांवर निनावी तक्रारींवरही कारवाई होते. त्यामुळे अशा कर्मचार्‍यांना अधिकार्‍यांचे पाठबळ मिळणे आवश्यक असते, असेही मत काही सेवानवृत्त पोलिसांनी व्यक्त केले.

** जनसंपर्क नसणे

पोलिसांना अनेक माध्यमातून गोपनीय माहिती प्राप्त होऊ शकते. सामान्य नागरिकही पोलिसांना माहिती देऊ शकतात. यासाठी पोलिसांचा दांडगा जनसंपर्क असणे आवश्यक आहे. पोलिस आपल्या संरक्षणासाठी आहेत, असा विश्‍वास सामान्य नागरिकांमध्ये निर्माण होणे गरजेचे आहे. पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी गेलेल्या तक्रारकर्त्यालाच पोलिस आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करतात. पोलिस आणि नागरिकांमध्ये सौहादार्याचे नाते निर्माण होण्यासाठी हे चित्र पालटणे आवश्यक आहे, असे जाणकार नमूद करतात.

** सशस्त्र टोळीचे होते वाशिम बायपासवर वास्तव

अजय रामटेके यांच्यावर गोळीबार करणार्‍या टोळीचे वाशिम बायपास परिसरातील एका फ्लॅटवर वास्तव्य होते, अशी माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. हल्ल्यात पिस्तूल, कोयत्यासह इतरही धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला. हा हल्ला पूर्वनियोजितच होता. हा हल्ला अचानक करण्यात आला नाही. शस्त्रांची जमवाजमव, कोण अँटोरिक्षा अडविणार, कोण गोळीबार करणार, कोणाच्या हातात कोणते शस्त्र राहणार, याचे संपूर्ण नियोजन आणि चर्चा या फ्लॅटमध्येच करण्यात आली, अशी शक्यता सूत्रांकडून वर्तविली जात आहे. टोळीच्या या हालचालींची माहिती पोलिसांना वेळीच मिळाली असती तर कदाचित हल्ला टळला असता. यासाठी गुप्तचर यंत्रणा प्रभावी असणे आवश्यक आहे.

** 'सुलहनामा'बाबतही पोलिस अनभिज्ञ

गुन्हेगारी जगतावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आकोट फैलमध्ये गत पाच वर्षात भडकलेल्या टोळीयुद्धात दोघांचा खून करण्यात आला. या दोन्ही हत्याकांडात न्यायालयात सोयीची साक्ष देण्यासाठी टोळ्यांमध्ये 'सुलहनामा' झाला. यासाठी टोळीतील सदस्य आणि संबंधितांच्या तीन बैठकाही झाल्या. याबाबत पोलिसांना वेळीच माहिती मिळाली असती तर टोळ्यातील सदस्यांवर ठोस कारवाई झाली असती.

** समन्वयाचा अभाव

गुप्तचर यंत्रणा प्रभावी होण्यासाठी पोलिस ठाण्यांमध्ये समन्वय आवश्यक असल्याचे जाणकारांचे मत आहे. अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी माहिती आदान-प्रदान करताना केवळ स्वत:च्या पोलिस ठाण्याच्या विचार न करता व्यापक पोलिसिंगचा दृष्टिकोन ठेवणे गरजचे आहे. अकोल्यात सध्या पोलिसिंगचे धिंडवडे निघाले असून, गुप्तचर यंत्रणा सक्षम करण्यासाठी पोलिसांनी समन्वय ठेवणे आवश्यक आहे.

** इच्छाशक्तीचा अभाव

खबर्‍यांचे जाळे विणण्यासाठी पोलिसांमध्ये इच्छाशक्तीचा अभाव असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. नेहमीचे तपास, बंदोबस्त याऐवजी एखाद्या माहितीवर सखोल अभ्यास करावा, अशी इच्छाच पोलिसांमध्ये नाही.

Web Title: Police 'nets' nets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.