‘हवाला’वर पोलिसांची नजर
By Admin | Updated: October 5, 2014 22:55 IST2014-10-05T22:55:14+5:302014-10-05T22:55:14+5:30
वाहनातून मोठी रक्कम आणायची म्हटले की, नाकाबंदीतती पकडली जाण्याची भीती उमेदवारांना असते. त्यामुळे राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी ‘हवाला’च्या माध्यमातून रक्कम मागविण्याची तयारी

‘हवाला’वर पोलिसांची नजर
उमेदवारांचे मनी ट्रान्सफर : नाकाबंदीचा फटका, हवाला येण्याची शक्यता
अमरावती : वाहनातून मोठी रक्कम आणायची म्हटले की, नाकाबंदीतती पकडली जाण्याची भीती उमेदवारांना असते. त्यामुळे राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी ‘हवाला’च्या माध्यमातून रक्कम मागविण्याची तयारी चालविली आहे. मात्र, या व्यवहारावर पोलिसांची करडी नजर असून कुरिअर सेवा देणाऱ्या प्रतिष्ठानांवर विशेष लक्ष असल्याचे दिसून येते.
हळूहळू विधानसभा निवडणुकीची रंगत वाढू लागली आहे. प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली असताना उमेदवारांना खर्चासाठी हात सतत खिशातच ठेवावा लागतो. त्यामुळे अनेक उमेदवारांकडे पैशाला बूड लागले आहे. एकाच वेळी मोठी रक्कम बाळगणे शक्य नसल्याने काही उमेदवारांनी ‘हवाला’च्या माध्यमातून बाहेरुन पैसे मागविण्याची तयारी चालविली आहे. निवडणुकीतील वाढता खर्च बघता उमेदवारांना पैशांची चणचण भासू लागली आहे. काही उमेदवारांनी संघटन बांधणी, कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्यासाठी यापूर्वीच भरमसाठ पैसा ओतला आहे. त्यामुळे निवडणुकीत प्रचाराला गती येताच त्यांना पैशांची चणचण भासू लागली आहे. उमेदवारांकडे पैसे आहेत, मात्र ते बाहेरगावाहून मागवायाचे कसे? हा खरा सवाल आहे. पक्षाकडून ‘फंड’ मागविण्यासाठी ‘हवाला’शिवाय पर्याय नाही. परंतु अमरावतीत ‘हवाला’ घ्यायला कुणी तयार नाही. कारण, कुरिअर कंपन्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. मुंबई येथून ‘हवाला’च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसा येण्याची शक्यता आहे. कोटींची उड्डाणे ‘हवाला’तूनच होणार असल्याची माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली आहे.