पोलीस धडकले बाजार समितीमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:12 IST2021-04-06T04:12:55+5:302021-04-06T04:12:55+5:30
परतवाडा : अचलपूर कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या नोकरभरतीसंदर्भात वारंवार पत्र देऊनसुद्धा बाजार समितीने असहकार पुकारल्याने सोमवारी दुपारी ३:२० वाजता ...

पोलीस धडकले बाजार समितीमध्ये
परतवाडा : अचलपूर कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या नोकरभरतीसंदर्भात वारंवार पत्र देऊनसुद्धा बाजार समितीने असहकार पुकारल्याने सोमवारी दुपारी ३:२० वाजता पोलिसांनी धडक दिली. पोलिसांनी बाजार समितीतून महत्त्वपूर्ण कागदपत्रे ताब्यात घेतल्याने सहकारक्षेत्रात खळबळ उडाली आहे.
अचलपूर कृषिउत्पन्न बाजार समितीच्या आठ संचालकांना अचलपूर न्यायालयाने सोमवारी अंतरिम अटकपूर्व जामीन दिला. दुसरीकडे नोकरभरतीसंदर्भात ठाणेदार सेवानंद वानखडे व सहकाऱ्यांनी बाजार समिती गाठली. बाजार समितीत पोलिसांचे वाहन पाहताच एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनुसार, बाजार समितीने केलेल्या सरळसेवा नोकरीसंदर्भातील काही कागदपत्रे सादर करण्यासंदर्भात अचलपूर पोलिसांनी बाजार समितीला अनेकदा पत्रे दिली होती. परंतु, बाजार समितीचे सचिव पवन सार्वे यांनी वेळकाढू धोरण अवलंबिले. परिणामी, सोमवारी दुपारी तपास अधिकारी तथा अचलपूरचे ठाणेदार सेवानंद वानखडे यांनी जाऊन आवश्यक ती कागदपत्रे तपासासाठी ताब्यात घेतली. त्या कागदपत्रांमधून नोकरभरतीचे घबाड उघडकीस येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सदर कागदपत्रे उपलब्ध करून देतो, असे सांगणारे सचिव पवन सार्वे पोलीस ताफा येताच धावपळ करीत होते.