अपहरणाच्या अफवेने पोलिसांची तारांबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2016 00:02 IST2016-06-23T00:02:14+5:302016-06-23T00:02:14+5:30
कॉटन मार्केट परिसरातून तीन बालक बेपत्ता झाल्याची तक्रार आई-वडील नोंदवीत असतानाच ते तीन बालक गाडगेनगर पोलीस ठाण्यात पोहोचले.

अपहरणाच्या अफवेने पोलिसांची तारांबळ
आनंदाश्रू : पालकानंतर बालकही पोहचले ठाण्यात
अमरावती : कॉटन मार्केट परिसरातून तीन बालक बेपत्ता झाल्याची तक्रार आई-वडील नोंदवीत असतानाच ते तीन बालक गाडगेनगर पोलीस ठाण्यात पोहोचले. मात्र, या अपहरणाच्या बनावट घटनेमुळे पोलिसांची ताराबंळ उडाली होती, हे विशेष.
गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बजरंग नगरातील रहिवासी ८ ते ११ वयोगातील बालक हे कॉटन मार्केट परिसरातील एका व्यावसायिकांकडे शितपेयाचे कॅरेट ट्रकांमध्ये चढविण्याचे काम करतात. दररोजप्रमाणे ते तीन बालके मंगळवारी सकाळी काम करण्यासाठी गेले. मात्र, रात्र होऊनही ते तिन्ही बालके घरी न पोहचल्याने आई-वडिलांना चिंता वाटू लागली होती. तिन्ही बालकांच्या आई-वडिलांनी नातेवाईक आणि ओळखीतील नागरिकांच्या घरी शोधाशोध सुरु केली. मात्र, तिन्ही बालके कोठेही आढळून आले नाही. त्यामुळे बुधवारी सकाळी बालकांच्या आई-वडिलांनी गाडगेनगर पोलीस ठाणे गाठले. ते तक्रार देत असतानाच अचानक ते तिन्ही बालके पोलीस ठाण्यात दाखल झाली.
ते रात्रभर कुठे होते, याबाबत ठाणेदार अर्जून ठोसरे यांनी बालकांनी विचारणा केली असता एका अज्ञात व्यक्तीने आम्हाला नास्ता करण्याचे आमिष दाखवून सोबत नेले आणि तिन्ही जणांनी मिळून आमचे हातपाय बांधले व एका पोत्यात टाकून वाहनात घेऊन गेल्याचे त्या बालकांनी पोलिसांना सांगितले. मात्र, त्यांनी ज्या ठिकाणी आम्हाला ठेवले होते. त्या ठिकाणी एक चाकू सापडला आणि आम्ही आमची सुटका करून घेतल्याचे बालकांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर आम्ही बडनेरा रेल्वे पोलीस ठाण्यात मदत मागण्यासाठी गेलो. तेथून पोलिसांनी दुपारी आम्हाला अमरावतीत पाठविले. बालकांनी अपहरणाचा असा बनाव सांगताच पोलिसांची तारांबळ उडाली.
बालकांनी अपहरणाची खोटी माहिती पोलिसांना दिली. त्याची विचारपूस करण्यात आल्यावर ते बालक मंगळवारी कामावर पैसे मिळाल्यानंतर फिरायला गेले होते. बुधवारी ते परत अमरावतीत आले. आई-वडिलांच्या भीतीमुळे त्यांनी अपहणाची खोटी कहाणी पोलिसांना सांगितली.
- अर्जुन ठोसरे, प्रभारी ठाणेदार, गाडगेनगर पोलीस ठाणे.