‘डोमा’ नाक्यावर पोलीस तैनात
By Admin | Updated: July 30, 2016 00:08 IST2016-07-30T00:08:51+5:302016-07-30T00:08:51+5:30
तालुक्यात सोमवारी भरणाऱ्या गांगरखेडा येथील आठवडी बैल बाजाराची दखल जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी गांभीर्याने घेतली असून ...

‘डोमा’ नाक्यावर पोलीस तैनात
तस्करीला चाप : गांगरखेडा बैलबाजाराची पोलिसांकडून दखल
चिखलदरा : तालुक्यात सोमवारी भरणाऱ्या गांगरखेडा येथील आठवडी बैल बाजाराची दखल जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी गांभीर्याने घेतली असून परिसरात रात्रीला गस्त आणि वन विभागाच्या डोमा येथील नाक्यावर पोलीस कर्मचारी नियुक्त करण्याचे आदेश दिले आहे.
गांगरखेडा येथे सोमवारी बैलबाजार भरतो. येथे मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणात शेतकरी व्यापारी गुरे विकायला आणतात तर व्यापरी मोठ्या प्रमाणात गुरांची खरेदी करून त्याची कत्तलखान्याकडे रवानगी करीत असल्याचे चित्र होते. त्याविरुद्ध सर्वप्रथम ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत होता. अखेर सोमवारी (२५ जुलै रोजी) परिसरातील युवकांनी आठवडी बाजार उधळून लावला होता. याची कुणकुण व्यापाऱ्यांना लागतच पहाटे ५ वाजता त्यांनी परिसरातून पोबारा केला होता. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र युवकांनी आपला मोर्चा थेट काटकुंभ पोलीस चौकीकडे वळवून जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांकरिता लेखी निवेदन दिले होते. त्यामध्ये गांगरखेडा येथे भरणाऱ्या आठवडी बाजारातून कत्तलखान्यात व्यापाऱ्यांकडून जाणाऱ्यांना गुरांना वाचविण्यासह भविष्यात मोठा अनर्थ घडण्याचे भाकीत वर्तविले होते. (प्रतिनिधी)
मध्यप्रदेशात बंदी, स्थानिकांना हप्ता
मध्यप्रदेशच्या सावलमेंढा बैतूल बाजार, शिवणी आदी ठिकाणी भरणाऱ्या गुरांच्या बाजारावर बंदी घालण्यासोबत गौमांस व अवैध कत्तलखान्याविरुद्ध बंदी आहे. परिणामी तेथील व्यापाऱ्यांनी आपला मोर्चा गांगरखेड्याकडे वळविला होता. आता या आठवड्यापासून त्यालाही चाप बसला आहे. दुसरीकडे चिखलदरा पोलीस या आदेशाचे किती दिवस तंतोतंत पालन करतात, यावरच नागरिकांच्या नजरा खिळल्या आहेत.
पोलीस अधीक्षकांकडून दखल
जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी गांगरखेडा येथील बैलबाजाराच्या निवेदनाची गांभीर्याने दखल घेतली. सोमवारी रात्री व दिवसा आणि मंगळवारी परिसरात गस्त घालण्यासह डोमा येथील वनविभागाच्या नाक्यावर एक पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्याचे आदेश दिल्याचे निवेदनकर्त्यांकडून सांगण्यात आले.