बलात्कारप्रकरणी ७ पर्यंत पोलीस कोठडी
By Admin | Updated: April 6, 2016 00:14 IST2016-04-06T00:14:43+5:302016-04-06T00:14:43+5:30
विधवा महिलेवर मातृत्व लादणाऱ्या ढाकणा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला ७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

बलात्कारप्रकरणी ७ पर्यंत पोलीस कोठडी
विधवेवरील अत्याचार प्रकरण : तक्रार नोंदविताच ‘ती’ झाली प्रसूत
धारणी : विधवा महिलेवर मातृत्व लादणाऱ्या ढाकणा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला ७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान फिर्यादी विधवेने तक्रारीच्या दिवशीच रात्री १० वाजता एका गोंडस बाळाला जन्म दिला.
ढाकणा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर धोटे यांचेविरूध्द त्यांच्याचकडे मोलकरीण म्हणून काम करणाऱ्या आदिवासी विधवा महिलेचा लैंगिक छळ करून अतिप्रसंग केल्यामुळे गर्भवती झालेल्या त्या विधवेने ३ एप्रिल रोजी धारणी पोलिसांत तक्रार नोंदविली होती. वनाधिकाऱ्याने तिला जीवनभर आर्थिक मदत करून भरणपोषण करण्याचे आश्वासन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे ती गर्भवती झाली होती. याप्रकरणी पूर्वीही तिने तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने तिला परावृत्त केले होते. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याविरोधात तक्रार नोंदविल्यानंतर त्याच दिवशी या विधेवेची प्रसूती झाली हे विशेष.
रविवारी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी बलात्कार व अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत आरोपी शंकर धोटे यांचेविरुध्द गुन्हा नोंदवून उशिरा रात्री त्याला अटक केली. सोमवारी आरोपीला प्रथम धारणी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमक्ष हजर करून पीसीआरची मागणी करण्यात आली. मात्र, अॅट्रॉसिटी कायद्याचे संज्ञात घेण्याचा अधिकार केवळ विशेष जिल्हा व सत्र न्यायालय यांना असल्याने अचलपूर येथे नेण्यात आले. सत्र न्यायालयाने आरोपीला ७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. विधवेसह तिच्या नवजाताची डीएनए तपासणी करणार असल्याचे तपास अधिकारी एसडीपीओ सेवानंद तामगाडगे यांनी सांगितले.