पोलीस आयुक्त म्हणतात, महापालिकेचे सहकार्य नाही

By Admin | Updated: September 3, 2014 23:00 IST2014-09-03T23:00:05+5:302014-09-03T23:00:05+5:30

गणेशोत्सवादरम्यान सुरक्षेच्यादृष्टीने आवश्यक असणारी कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी, या अनुषंगाने पोलीस विभागाकडून महापालिकेला अनेकदा पत्रव्यवहार करण्यात आले. परंतु त्यांच्याकडून

Police Commissioner said, NMC does not cooperate | पोलीस आयुक्त म्हणतात, महापालिकेचे सहकार्य नाही

पोलीस आयुक्त म्हणतात, महापालिकेचे सहकार्य नाही

अमरावती : गणेशोत्सवादरम्यान सुरक्षेच्यादृष्टीने आवश्यक असणारी कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी, या अनुषंगाने पोलीस विभागाकडून महापालिकेला अनेकदा पत्रव्यवहार करण्यात आले. परंतु त्यांच्याकडून कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही. गणेशोत्सवात महापालिकेकडून सहकार्य मिळत नसल्याने पोलिसांना अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांनी सांगितले.
शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांनी गणेशोत्सवापूर्वी इतर विभागांतील सर्व जबाबदार अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. बैठकीमध्ये त्यांनी अधिकाऱ्यांना सुरक्षेच्यादृष्टीने आवश्यक सूचना केल्या होत्या. गणरायांचे आगमन व विसर्जन मिरवणुका लक्षात घेता गणेशमूर्तीची विटंबना होऊ नये या अनुषंगाने त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना रस्त्यांवरील खड्डे, पथदिवे, अतिक्रमण हटविण्यासंदर्भात पत्रव्यावहार केला होता. परंतु महापालिकेकडून पोलिसांना ही कामे पूर्ण करण्यासाठी कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून पुन्हा महापालिकेला स्मरणपत्र पाठविण्यात आले. परंतु त्यानंतरही महापालिकेकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचे मत बुधवारी पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांबाबत पोलीस आयुक्तांच्या वक्तव्यावर महापालिका आयुक्तांशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही.
विसर्जनस्थळी पोलीस आयुक्तांची भेट
मोठ्या मंडळांच्या गणेशमूर्ती दरवर्षी छत्री तलाव, प्रथमेश तलाव, पेढी नदी, कामुंजा नदी इत्यादी ठिकाणी शिरवण्यात येतात. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने तेथे पोलीस विभागाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नांदगाव पेठ व बडनेरा येथील काही मंडळांचे पदाधिकारी वादग्रस्त असल्याचे पाहून तेथे राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्यांसह मोठ्या प्रमाणात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या सर्व ठिकाणी पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांनी भेटी देऊन तेथील सुरक्षेचा आढावा घेतला आहे.

Web Title: Police Commissioner said, NMC does not cooperate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.