पोलीस पाटलाने केला पत्नीचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 01:19 IST2019-06-02T01:17:33+5:302019-06-02T01:19:08+5:30
तालुक्यातील विहिगाव येथील पोलीस पाटलाने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा साडीने गळा आवळून खून केला. कुसुम भांबूरकर असे मृताचे आणि पुरुषोत्तम भांबूरकर असे आरोपीचे नाव आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी उशिरा रात्री गुन्हा नोंदविला.

पोलीस पाटलाने केला पत्नीचा खून
लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील विहिगाव येथील पोलीस पाटलाने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा साडीने गळा आवळून खून केला. कुसुम भांबूरकर असे मृताचे आणि पुरुषोत्तम भांबूरकर असे आरोपीचे नाव आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी उशिरा रात्री गुन्हा नोंदविला.
पोलीस सूत्रानुसार, रहिमापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विहिगाव येथे कुसुम पुरुषोत्तम भांबूरकर (५०) ही महिला आपल्या राहत्या घरात मृतावस्थेत पडल्याची माहिती शेजाऱ्यांनी रहिमापूर पोलिसांना शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. संशयावरून पती पुरुषोत्तम भांबूरकर याला ताब्यात घेतले. तथापि, त्याच्याकडून याप्रकरणी उडवाउडवीची उत्तरे मिळत होती. मात्र, शनिवारी रहिमापूर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी यांच्या नेतृत्वात दाखल झालेल्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाने पोलिसी खाक्या दाखवताच त्याने घटनाक्रम कथन केला आणि खुनाची कबुली दिली.
भांबूरकर दाम्पत्याचे २० वर्षांपासून पटत नव्हते. गावातच वेगवेगळ्या घरांत ते राहत होते. शुक्रवारी कडाक्याच्या भांडणानंतर पुरुषोत्तमने कुसुमचा तिच्याच साडीने गळा आवळून खून केला.
पोलिसांपुढे कबुली दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंजनगाव सुर्जी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सोयम मुंडे यांनी घटनास्थळाला भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास रहिमापूर पोलीस करीत आहेत.
ठाणेदार झाले खुनाचे फिर्यादी
विहिगाव येथील घटनास्थळ निरीक्षणानंतर रहिमापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार जमील रहिम शेख यांनी खुनाची फिर्याद देऊन आरोपीला ताब्यात घेतले. पुरुषोत्तम भांबूरकरला रविवारी न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आहे.
निवृत्ती एक महिन्यावर
पत्नीचा गळा आवळून खून करणारा पुरुषोत्तम भांबूरकर हा ३० जून रोजी पोलीस पाटील पदावरून निवृत्त होणार होता. या दाम्पत्याला दोन मुली व एक मुलगा आहे.