'आरटीओ' इमारतीची दुर्दशा

By Admin | Updated: September 1, 2016 00:24 IST2016-09-01T00:24:15+5:302016-09-01T00:24:15+5:30

येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या इमारतीला जागोजागी भगदाडे पडली आहेत. छतामधून पाण्याची गळती होते,

The plight of 'RTO' building | 'आरटीओ' इमारतीची दुर्दशा

'आरटीओ' इमारतीची दुर्दशा

३३ वर्षांत इमारत जीर्ण : आवारात पाण्याचे डबके, कचऱ्याचे ढिगारे
मनीष कहाते अमरावती
येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या इमारतीला जागोजागी भगदाडे पडली आहेत. छतामधून पाण्याची गळती होते, कचऱ्याचे ढिगारे साचले आहे. कार्यालयातील फर्निचर मोडके, तोडके झाले आहे. परिसरात पाण्याचे डबके साचले आहे. त्यामुळे कार्यलयाची अवस्था गुरांच्या गोठयासारखी झाली आहे.
येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय एकाच इमारतीत आहे. १९८३ साली इमारतीचे बांधकाम झाले आहे. संपूर्ण कार्यालयातील स्लॅबला गळती लागली आहे. विशेष म्हणजे बांधकाम विभागाने तीन महिन्यांपूर्वीच छताची गळती थांबविण्यासाठी प्लास्टर केले, हे विशेष. इमारतीच्या संपूर्ण परिसरात कचऱ्याचे ढीग लागले आहेत.
कार्यालयासमोरच पाण्याचे भलेमोठे डबके साचले आहेत. कार्यालयासमोर झेंड्याच्या बाजुला कचऱ्याचा ढिगारा लागला आहे. पार्किंगची जागा निश्चित झाली आहे. तरी वाहने अस्ताव्यस्त दिसून येतात. दुचाकी वाहनतळाजवळ रेतीचा ढीग आहे. शिकाऊ उमेदवारासाठी गाडी चालविण्याकरीता असलेल्या रस्त्यावरील लोखंडी कठडे तुटलेले आहेत. इमारतीच्या आजुबाजुला गवत वाढले आहे. परिसरातील डांबरी रस्त्यावरचे डांबर उडाले आहे.
कार्यालयाच्या दोन मजली इमारतीमध्ये मोडलेले फर्निचर अस्तव्यस्त पडलेले आहे. पान खाऊन थुंकल्याच्या पिचकाऱ्या जागोजागी भिंतीवर दिसून येतात. इलेक्ट्रीकची फिटिंग पूर्णपणे उखडली आहे. केव्हाही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहनाच्या कागदपत्राचे रजिस्टर देखील जीर्ण झाले आहे.
रजिस्टर ठेवलेल्या आलमाऱ्या तुटलेल्या आहेत. वाहनधारकांच्या विविध कामांकरिता ३८ काचा लावलेल्या खिडक्या आहेत. काचाही फुटलेल्या आहेत. त्यावर धूळ पसरलेली आहे. कार्यालयातील १५ टेबल आणि खुर्च्या मोडलेल्या आहेत. एकूण २९ कर्मचारी कार्यालयात कामाला आहेत. परंतु ते कधीच वेळेत कार्यालयात हजर नसतात. कार्यालयातील प्रमुख अधिकाऱ्यांचे दालन सोडले तर कुठेही स्वच्छता दिसत नाही. कार्यालयातील अर्धेअधिक लाईट, पंखे बंद अवस्थेत आहेत. टेबलावरच्या चादरी, खुर्चीवरच्या उशा गेल्या कित्येक वर्षापासून धुतल्या नसल्याने सर्वत्र डाग पडलेले आहेत. चादरीही फाटलेल्या आहेत. उशांचे फोम कापडाच्या बाहेर निघाले आहेत. कार्यालयाच्या इमारतीचा रंग उडाला आहे. खुर्च्यांवर रजिस्टर ठेऊन कर्मचारी बसत आहेत. अशी विदारक स्थिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाची झाली आहे.

Web Title: The plight of 'RTO' building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.