गणोरी भातकुली रस्त्याची दुर्दशा
By Admin | Updated: June 14, 2015 00:17 IST2015-06-14T00:17:28+5:302015-06-14T00:17:28+5:30
भातकुली हे तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे तहसील कार्यालयार्पंत सर्वच सोई उपलब्ध आहेत.

गणोरी भातकुली रस्त्याची दुर्दशा
पायी चालणेही कठीण : गावकऱ्यांची डांबरीकरणाची मागणी
भातकुली : भातकुली हे तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे तहसील कार्यालयार्पंत सर्वच सोई उपलब्ध आहेत. परंतु गणोरीवासीयांना त्याचा फायदा होत नाही. गणोरी हे गाव अद्यापही भातकुलीला पक्क्या रस्त्याने जोडलेले नाही. गणोरी-भातकुली रस्त्याच्या खडीकरणासाठी मंजूर झालेले ८० लक्ष रुपये पूर्णत: पाण्यात गेल्याची ओरड आहे.
गणोरी हे गाव जिल्ह्यात प्रसिध्द आहे. ते महंमदखान महाराजांमुळे हिन्दू-मुस्लिम एकतेचे प्रतीक अशी या गावाची ओळख आहे. पण लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणामुळे अद्यापही हे गाव भातकुलीशी पक्क्या रस्त्याने जोडले गेले नाही. परलाम, उत्तमसरा, कवठा, निंभोरा, शिवणी, शिवगाव, बहाद्दरपूर, खरबी, खल्लार इत्यादी गावातील नागरिकांना भातकुलीला जायचे झाल्यास नाहक फेऱ्याने जावे लागतात. वास्तविक पाहता गणोरी-भातकुली हे रस्ता केवळ ४ कि.मी.चे अंतर आहे. म्हणजे अवघ्या ५ मिनिटांमध्ये भातकुली गाठणे सहज शक्य आहे. परंतु रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे २० ते २५ कि.मी. चा फेरा आगाऊ मारावा लागतो.
गणोरी - भातकुली हा राज्य ग्रामीण मार्ग क्र. ८२ असून लवकरात लवकर या मार्गावर डांबरीकरण करण्यात यावे व तालुक्यातील जनतेला नाहक त्रासापासून मुक्त करावे, अशी मागणी गणोरी, परलाम, उत्तमसरा, कवठा, निंभोरा, शिवगाव, शिवणी, खरबी, बहाद्दरपूर येथील नागरिकांनी केली आहे. पुढे पावसाळा आहे. पावसाळ्यात या रस्त्याची अधिकच दुर्दशा होईल. नागरिकांना व वाहनधारकांना या मार्गाने जाणे-येणे कठीण होईल. ही संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन तातडीने या रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी या मार्गाने दररोज ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या व प्रवाशांच्यावतीने करण्यात आली आहे. (वार्ताहर)