गांधी पूल-हरम रस्त्याची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:14 IST2021-02-09T04:14:23+5:302021-02-09T04:14:23+5:30
फोटो पी ०८ हरम पालिका कुंभकर्णी झोपेत, नागरिक त्रस्त अचलपूर : गांधी पूल ते हरम या मुख्य रस्त्याची मोठ्या ...

गांधी पूल-हरम रस्त्याची दुर्दशा
फोटो पी ०८ हरम
पालिका कुंभकर्णी झोपेत, नागरिक त्रस्त
अचलपूर : गांधी पूल ते हरम या मुख्य रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली आहे. अचलपूरकरांना ये-जा करण्याकरिता तारेवरची कसरत करावी लागते. एवढे असूनसुद्धा अचलपूर नगरपालिका प्रशासन कुंभकर्णी झोपेत असून, नागरिक त्रस्त आहेत.
अचलपूर पालिका हद्दीतील गांधी पूल-रायपुरा-अब्बासपुरा-हरम या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात, मुख्य रस्त्यावर आजूबाजूच्या नाल्याचे पाणी सतत वाहत असते. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. गांधी पूल परिसरात महाविद्यालय, विद्यालय असून, शुक्रवारी मोठ्या प्रमाणात येथे बाजार भरतो. गांधी पूल परिसरातून अब्बासपुरा, रायपुरा, मेहराबपुरा, चौखंडी, रासेगाव, हरम, चमक, भिलोना, पथ्रोट, खांजमानगर, नायगाव, बोर्डी, चौसाळा या भागांतील शेकडो नागरिक, विद्यार्थी, महिला याच रस्त्यावरून दररोज ये-जा करतात. या रस्त्यात खड्डा कुठे आहे आणि रस्ता कुठे आहे, हे शोधणेसुद्धा कठीण आहे. दररोज शेकडो दुचाकी, ऑटोरिक्षा या रस्त्यावर असतात. रस्त्याची ठिकठिकाणी चाळण झाली आहे. रस्त्यावरून ये-जा करण्याकरिता
नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. लहान-मोठे अपघात या रस्त्यावर दररोज होत असतात.
पालिका ‘ढ’
अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठी ‘अ’ वर्ग नगरपलिका म्हणून अचलपूरचा नावलौकीक आहे. मात्र, विकासकामांत ही पालिका ‘ढ’ झाली आहे. शेकडो नागरिकांची अत्यावश्यक गरज असलेली चांगले रस्ते हे अचलपूरकरांसाठी स्वप्नच राहिले आहे. अचलपूरकरांना खड्डेमुक्त रस्त्यातूनच ये-जा करावी लागत असून, प्रशासनाविरोधात नागरिक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.