पीक विम्याची मुदतवाढ ठरली कुचकामी
By Admin | Updated: August 12, 2015 00:08 IST2015-08-12T00:08:33+5:302015-08-12T00:08:33+5:30
केंद्र शासनाने पीक विमा योजनेची मुदत वाढविली असली तरी तांत्रिक बाबींमुळे वाढीव मुदतही केवळ फार्सच ठरली आहे.

पीक विम्याची मुदतवाढ ठरली कुचकामी
जितेंद्र दखने अमरावती
केंद्र शासनाने पीक विमा योजनेची मुदत वाढविली असली तरी तांत्रिक बाबींमुळे वाढीव मुदतही केवळ फार्सच ठरली आहे.
केवळ १ ते ७ आॅगस्ट दरम्यान पेरणी केलेल्या पिकांचा विमा प्रस्ताव करून घेण्याचा आदेश शासनाने काढला होता. परिणामी १ आॅगस्ट पूर्वी पेरणी झालेल्या कोणत्याच पिकांचा प्रस्ताव दाखल करून घेण्यास सहकारी बँकांनी नकार दिल्याने वाढीव मुदतीचा कोणताच लाभ शेतकऱ्यांना झाला नाही यामुळे वाढीव मुदतीत विना प्रस्ताव देण्यास गेलेल्या अनेक शेतकऱ्यांना मन:स्ताप सहन करावा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी शासनाने मुदत वाढविली. पण या मुदतीत मागील पेरणीची नोंद घेतली नाही. या योजनेत सहभागी होण्यासाठी बँका पीक परिस्थितीबाबत तलाठ्यांचा दाखला ग्राह्य धरतात. अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे दाखल्याची मागणी केली असता पाऊस नसताना तुम्ही पेरणी केलीच कशी असा प्रश्न शेतकऱ्यांना विचारल्या जात आहे.
आॅगस्टपूर्वीची
पेरणी ग्राह्य नाही
वाढीव मुदतीचा आदेश काढताना शासनाने पेरणी केलेली मुदत १ ते ७ आॅगस्टच्या दरम्यानच असावी, असे म्हटले होते. जर एखाद्या शेतकऱ्याचा या मुदती अगोदर पेरण्या केलेल्या पिकांचा प्रस्ताव राहिला असेल व तो शेतकरी प्रस्ताव द्यायला गेला तर त्याला आदेश दाखवीत प्रस्ताव नाकारल्याचे अनेक उदाहरणे आहेत. प्रस्तावच घ्यायचे नाही तर मुदतवाढ कशाला, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
आॅगस्टमध्ये कोणत्या पिकाची पेरणी करावी ?
शासनाने मुदतवाढ दिली असली तरी आॅगस्टमध्ये कोणती पेरणी करायची, असा सवाल अनेक शेतकऱ्यांचा आहे. शासनाने केवळ नावालाच ही मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी प्रशासनाकडून उदासीनता दाखविण्यात येत आहे. मुदत वाढवून तांत्रिक चूक ठेवल्याने विविध बँकांमध्ये वाढीव मुदतीचे पीक विमा प्रस्ताव दाखल झाले नाहीत.
वंचित शेतकऱ्यांना योजनेत सामावून घ्या
शासनाने पीक विमा योजनेला मुदतवाढ दिली असली तरी अनेक बँकांनी शासनाच्या आदेशाला हरताळ फासत परिपत्रक मिळाले नसल्याचे कारण देत शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यास टाळाटाळ केल्याचे उदाहरणे आहेत. त्यामुळे योजनेच्या मुदतवाढीच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेला असून वंचित शेतकऱ्यांना योजनेत सामावून घेण्याची मागणी होत आहे.
शासनाने १ ते ७ आॅगस्टपर्यंत पिक विमा काढण्यासाठी मुदत वाढ दिली होती. मात्र वरील कालावधीत पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनाच यामध्ये सहभागी करून घेतले. ज्यानी ३१ जुलैपर्यंत पीक पेरणी केली अशांना वाढीव मुदतीत सहभाग करूण घेता येत नाही.
- दत्तात्रय मुळे, कृषी अधिक्षक अधिकारी अमरावती.