कोविड सेंटर्समध्ये सुखद शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:10 IST2021-06-17T04:10:09+5:302021-06-17T04:10:09+5:30
अमरावती : काही दिवसापूर्वी बेड मिळविण्यासाठी नागरिकांना मोठ्या दिव्यातून जावे लागले. परंतु, आता कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्याने अमरावतीकरांना ...

कोविड सेंटर्समध्ये सुखद शुकशुकाट
अमरावती : काही दिवसापूर्वी बेड मिळविण्यासाठी नागरिकांना मोठ्या दिव्यातून जावे लागले. परंतु, आता कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्याने अमरावतीकरांना दिलासा मिळत आहे. जिल्हा परिषदेने ग्रामीण भागात उभारलेल्या २८ कोविड केअर सेंटरमधील १४ सेंटरमध्ये केवळ १३६ रुग्ण आहेत, तर अर्धे कोविड केअर सेंटर रिकामे झाले आहेत.
कोरोना संकटाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेने सर्वांनाच भयभीत करून सोडले होते. जिल्हा परिषदेने जिल्ह्यात ग्रामीण भागात २८ कोविड केअर सेंटर सुरू केले होते. यामध्ये १८७९ बेडची सुविधा उपलब्ध करून दिली होती. तथापि, अनेक रुग्णांना कोरोनाच्या वाढत्या संसर्गामध्ये बेडसाठी वणवण भटकावे लागले होते. अशातच सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांनी घरीच राहून उपचार घेतले, अनेक अत्यवस्थ रुग्णांनी रुग्णालयाच्या पायरीवरच जीव सोडला. परंतु, गत काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्याने रुग्णांचे पॉझिटिव्हचे प्रमाण खाली आले असून, बरे होण्याचे प्रमाणही बऱ्यापैकी आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने विविध तालुक्यांमध्ये सुरू केलेल्या १८ पैकी १४ कोविड केअर सेंटर रिकामे झाले आहेत. १५ जूनच्या अहवालानुसार झेडपीच्या कोविड सेंटरमध्ये केवळ १३६ रुग्ण दाखल आहेत, तर १८७९ पैकी १७३४ बेड रिकामे आहेत.
बाॅक्स
नियमांचे पालन आवश्यक
दुसरी लाट ओसरत असल्याने रुग्णसंख्या कमी झालेली असली तरी कोरोनाचे सावट कायम आहे. यामुळे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक त्रिसूत्रीचे पालन करणे गरजेचे आहे. मास्क लावणे, वारंवार हात धुणे आणि सामाजिक अंतर राखणे या नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख, आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले आदींनी केले आहे.
बॉक्स
१४ सेंटर रिकामे
आदिवासी आश्रम शाळा चिखली, धारणी, डोमा, टेब्रुसोंडा, आदिवासी होस्टेल चिखलदरा, अचपूर, बुरडघाट, चांदस वाठोडा, गर्ल्स होस्टेल भातकुली, हातुर्णा (वरूड), होमगार्ड ऑफिस, काटकु्ंभ आदी ठिकाणचे कोविड केअर सेंटर मध्ये एकही रुग्ण नाही.
बॉक्स
केवळ १३६रुग्ण दाखल
पांढरी खानापूर (ता. अंजनगाव सुर्जी) १८, बीसी होस्टेल चांदूर रेल्वे ९, बेनोडा (ता. वरूड) १, चांदूर बाजार १२, समदा (दर्यापूर) १७, धामनगाव रेल्वे ११, कल्याण मंडपम् अचलपूर ९, खेड २, नेरपिंगळाई १, नांदगाव खंडेश्वर २, मोशी १६, व्हीएमव्ही होस्टेल ८, वलगाव २७, झेडपी विश्रामगृह ३ असे एकूण १५ जूनपर्यंत १३६ रुग्ण १४ कोविड केअर सेंटरमध्ये दाखल आहेत.