चला खेळा, धम्माल करा ‘लोकमत’संगे !
By Admin | Updated: April 9, 2015 00:18 IST2015-04-09T00:18:47+5:302015-04-09T00:18:47+5:30
आपल्या प्रिय व्यक्तीच्या हातात हात घालून धुंदपणे भर रस्त्यातून फिरायचयं... वेड्यासारखं बागडायचयं, खेळायचयं, ..

चला खेळा, धम्माल करा ‘लोकमत’संगे !
अमरावती : आपल्या प्रिय व्यक्तीच्या हातात हात घालून धुंदपणे भर रस्त्यातून फिरायचयं... वेड्यासारखं बागडायचयं, खेळायचयं, सायकलिंग करायचयं... बॅडमिंटनची रॅकेट घेऊन बिनधास्तपणे मित्रांसोबत स्मॅश करायचयं... मुलांसोबत मुलं होऊन पकडापकडी खेळायचीय.. फिटनेसचा फंडा गिरवायचयं नाहीतर अरोबिक्ससोबत वर्कआऊट करण्याची मजा लुटायची आहे. हॉर्न, ब्रेक, रेसींग असा कसलाच आवाज न ऐकता नुसतंच निवांतपणे गप्पा मारत बसायचयं आणि हे सगळं करायचयं अमरावतीतील भर रस्त्यात. कशी धम्माल कल्पना आहे ना! काय म्हणता, वाहनांनी गजबजलेल्या आणि धूर, धूळ व आवाजाच्या गदारोळात रस्त्यावर असं बेभान होता येऊ शकेल? खरं नाही वाटत? पण अशी धम्माल खरचं होणार आहे. रस्त्याच्या मध्ये उभे राहून जगण्याचा कैफ अनुभवण्याची संधी, ‘धमाल गल्ली’च्या माध्यमातून ‘लोकमत’ घेऊन येत आहे.
'लोकमत'च्यावतीने 'धम्माल गल्ली' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १२ एप्रिलपासून कार्यक्रमाला प्रारंभ होत आहे. घड्याळात सात वाजले की पुढचे तीन तास आपल्या आवडत्या रस्त्यांचा मनसोक्त आनंद लुटता येणार आहे. पहिल्या रविवारी म्हणजे येत्या १२ एप्रिल रोजी अमरावतीतील इर्विन चौक ते गर्व्हमेंट गर्ल्स हायस्कूल चौक या रस्त्यावर सकाळी ७ वाजता 'धम्माल गल्ली'चा प्रारंभ होईल. त्यामुळे १२ एप्रिलपासून पुढचे आठ रविवार या 'धम्माल गल्ली'त धम्माल करण्यासाठी आजपासूनच राखीव ठेवा.
या रस्त्यांवर मोकळं ढाकळं होण्यासाठी बच्चे, तरुणाई, वृध्द सगळ्यांनीच आपल्या ग्र्रुपसोबत प्लानिंग करायला हरकत नाही. या धम्माल गल्लीत बच्चेकंपनीपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांसाठीच काहीतरी खास असणार आहे. या धम्माल गल्लीत तुम्हीही शाहरुखसारखं हात पसरवू शकाल. इतकचं नव्हे, लहानपणी खेळलेला चोर पोलिसांचा डावही मांडू शकणार. मोठ्यांनाच नव्हे तर बच्चे कंपनीलाही खूप चिल्लमचिल्ली करण्याची मुभा या गल्लीत मिळणार आहे. फिटनेसचा मंत्रा, खेळाचा आनंद, अॅरोबिक्स, सायकलिंग, बॅडमिंटन, स्केटिंग करता येणार आहे. जागेच्या मैदानाच्या अभावाने खेळातली ऊर्जा माहिती नसणाऱ्या चिमुरड्यांसाठी ‘कीडस कॉर्नर’ असेल. त्यांच्यासाठी निरनिराळ्या स्पर्धाही असणार आहेत. शिवाय भर रस्त्यात नेलपेंट्स, टॅटूज, मेहंदी काढण्याची मजाही काही निराळीच असेल. आपल्या कलाविष्कारासाठी ‘आर्ट अॅन्ड क्रॉफ्ट’ झोनसुध्दा असणार आहेत.
रविवारी ‘धम्माल गल्ली’
रस्त्यावरुन वाहनांची सुट्टी करुयात. पहावं तेव्हा रस्त्यावर वाहनांवरुनच का बरं फिरायचं? कुळकुळीत रस्त्यांना कधीतरी माणसांचाही पदस्पर्श करुयात. ध्वनी आणि हवा प्रदूषणाला थोडावेळ ‘बाय बाय’ करुन धमाल अनुभवूयात धमाल गल्लीत. चला तर धमाल गल्लीत कमाल करुया.