दर्यापुरात प्लास्टिकबंदी फसली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 12:57 AM2019-09-03T00:57:20+5:302019-09-03T00:57:39+5:30

श्रीगणेशाच्या मुर्तीलाही प्लास्टिकचे आवरण सर्रास पाहावयास मिळत आहे. याशिवाय सजावटीचे साहित्यही प्रतिबंधित प्लास्टिक बॅगमधून दिले जात आहे. याबाबत पालिका प्रशासनाने सोईस्कर मौन धारण केले आहे. पालिकेची कारवाई थंडावली आहे.

Plastic shutdown was fueled throughout the day | दर्यापुरात प्लास्टिकबंदी फसली

दर्यापुरात प्लास्टिकबंदी फसली

Next
ठळक मुद्देसरसकट उल्लंघन : सणासुदीला सर्रास वापर, पालिकेची कारवाई थंडावली

किरण होले।
लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : राज्य शासनाने मोठा गाजावाजा करून प्लास्टिकबंदीचा निर्णय घेतला. मात्र, प्लास्टिकबंदी राज्यात अनेक ठिकाणी फसली असल्याचेच दिसत आहे. शहरात प्लास्टिकबंदी कागदावरच दिसत असून, शहरातील हातगाड्यांसह दुकानांमध्ये सर्रास प्लास्टिकचा वापर होत आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत तर प्लास्टिकचा वापर बेसुमार वाढला आहे. श्रीगणेशाच्या मुर्तीलाही प्लास्टिकचे आवरण सर्रास पाहावयास मिळत आहे. याशिवाय सजावटीचे साहित्यही प्रतिबंधित प्लास्टिक बॅगमधून दिले जात आहे. याबाबत पालिका प्रशासनाने सोईस्कर मौन धारण केले आहे. पालिकेची कारवाई थंडावली आहे.
केंद्र सरकारच्या निर्णयानुसार, ५० मायक्रॉनखालील प्लास्टिक कॅरी बॅगच्या वापरावर बंदी आहे. दुसरीकडे पर्यावरणास हानिकारक असलेल्या असलेल्या प्लास्टिकवर राज्य शासनाने बंदी घातली आहे. त्यानंतर नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून शहरा-शहरात प्लास्टिक कॅरी बॅगचा वापर करणाऱ्यांवर कारवाया करण्यात आल्या. दर्यापुरातही सुरुवातीला धडाक्यात कारवाई करण्यात आली. शासनाने प्लास्टिक कॅरी बॅग दिसल्यानंतर पाच हजार रुपयांचा दंड आकरण्याचा निर्णय घेतला. व्यापाऱ्यांकडून शेकडो किलो प्लास्टिक जप्त केल्यानंतरही पाच हजारांचाच दंड आकारला जात असल्याने त्यांनी प्लास्टिकबंदी गांभीर्याने घेतली नाही. प्रशासनाकडून केवळ दंड आकरण्यात येत असल्याने व्यापाऱ्यानी प्लास्टिकचा वापर सुरूच ठेवला आहे. परिणामी शहरात प्लास्टिकबंदीचा पूर्णत: फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सोमवारी गणेशचतुर्थीच्या निमित्ताने बाजारपेठेत ग्राहकांची मोठी गर्दी होती. मात्र ७० टक्के ग्राहकांना प्रतिबंधित प्लास्टिक बॅगमधूनच साहित्य देण्यात आले. गणेशोत्सवासाठी लागणारे फळ तर हटकून प्रतिबंधित काळ्या रंगाच्या थैलीमधून देण्यात आले. प्रशासन त्याबाबत मौन आहे.

नागरिकांमधून प्रश्न
शहरातील अनेक दुकानांसह हातगाड्यांवरही प्लास्टिक पन्नीचा बिनधास्त वापर होताना दिसून येत आहे. दुकानदार व हातगाडेवाले प्लास्टिक बॅगेत साहित्य देत असल्याने नागरिकही मुक्तपणे वापर करीत आहेत. शहरातील हे चित्र झाल्यानंतर खरेच प्लॉस्टिकबंदीचा निर्णय झाला आहे का, असा प्रश्न सुजाण नागरिकांतून विचारला जाऊ लागला आहे.

प्लास्टिक कचऱ्याची वाढती डोकेदुखी
शहरात प्लास्टिकचा वापर सर्रास होत असल्याने त्याचा कचरा कमी झालेलाच नाही. परिणामी शहरातील अनेक ठिकाणी प्लास्टिक कचºयाचा ढीग पहायला मिळत आहे. प्लास्टिकबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी नीट होत नसल्याने ही स्थिती पाहायला मिळते. बाजारपेठेच्या कोपऱ्यात, हातगाड्यांजवळ प्लास्टिकचा सर्वाधिक कचरा दिसून येतो.

बंदीनंतरही पुरवठा कसा?
बंदीनंतरही प्लास्टिक बॅगचा पुरवठा कसा होतो, असा प्रश्न उपस्थित होत आहे. बंदीचा निर्णय झाल्यानंतरही उत्पादन सुरु आहे का, त्याच नियमित पुरवठा होता का, याची साधी कल्पनाही प्रशासन किंवा शासनाला नाही का, असे प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहेत. मात्र, यासंबंधी उत्तर देण्यास ना लोकप्रतिनिधी पुढे येत, ना प्रशासकीय अधिकारी.

 

Web Title: Plastic shutdown was fueled throughout the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.