शाळांमध्ये राबविणार वृक्षारोपण योजना
By Admin | Updated: July 18, 2015 00:12 IST2015-07-18T00:12:00+5:302015-07-18T00:12:00+5:30
राज्यातील प्रत्येक शाळेत भौतिक सुविधाविषयक निकषाचे पालन बंधनकारक आहे.

शाळांमध्ये राबविणार वृक्षारोपण योजना
पर्यावरणविषयक जागृती : ५ जून ते ३१ आॅगस्टदरम्यान वन महोत्सव
अमरावती : राज्यातील प्रत्येक शाळेत भौतिक सुविधाविषयक निकषाचे पालन बंधनकारक आहे. यात शाळेच्या विद्यार्थ्यांना सावली मिळण्यासाठी आवारात वृक्षांची लागवड करणे याचा अंतर्भाव आहे. पर्यावरण संवर्धन व त्याबाबत जागृती करण्यासाठी ५ जून ते ३१ आॅगस्ट दरम्यान वन महोत्सव साजरा केला जातो. या कालावधीत प्रत्येक शाळेत वृक्षारोपण करण्याचे आदेश शालेय विभागाचे उपसचिव अविनाश साबळे यांनी १५ जुलै रोजी दिले आहेत. या वनमहोत्सवाच्या कालावधीत शालेय विद्यार्थ्यामध्ये नवे, वन्यप्राणी, जैवविविधता व दुर्मीळ अशा वनसंपदेचे रक्षण व त्याचे संवर्धन याबाबत विद्यार्थ्यांना संस्कारक्षम वयात जाणीव व आवड निर्माण व्हावी यासाठी ही वृक्षारोपण योजना शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे.
सन २०१५-१६ मधील पावसाळ्यात वृक्षारोपण योजनेंतर्गत जिल्हा परिषद, नगरपरिषद, महापालिका, नगरपालिका इत्यादी शाळांमध्ये वृक्षारोपण करणे आवश्यक आहे. तसेच वृक्षारोपणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रत्येक शाळेत २० रोपांचे पॅकेज वन व सामाजिक वनीकरण विभागाकडून देण्यात येणार आहे. या पॅकेजमध्ये मिश्र रोपांचा समावेश राहणार आहे.
या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी सर्व शाळांना प्रोत्साहन म्हणून ३ रूपये प्रतिरोपाच्या वाहतूक खर्चासह देण्यात येणार आहे. वन आणि सामाजिक वनीकरण योजनांतर्गत एम. जी. नरेगा, रोहयो, वनमहोत्सव आणि कॅम्प अंतर्गत तयार करण्यात आलेल्या रोपवाटिकेमधून रोपांची उपलब्धता केली जाणार आहे.
यासाठी या विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून वाहतुकीचे नियोजन करून कमी खर्चात जवळच्या रोपवाटिकेपासून ते शाळेपर्यंत रोपे पोहोचविण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेमध्ये तसेच खासगी अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयं-अर्थसहाय्यित शाळांसाठी हा कार्यक्रम ऐच्छिक स्वरुपाचा राहणार आहे. १५ आॅगस्ट रोजी झेंडावंदनाचा कार्यक्रम झाल्यावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम करावा, असे शासनाचे निर्देश आहेत. (प्रतिनिधी)
वृक्षारोपणाच्या दृश्य परिणामासाठी शाळांची कार्यवाही
वृक्षारोपणानंतर रोपाचे किमान चार वर्षे, जनावरापासून रक्षण करणे, रोपांचे संरक्षण करणे, पाणीपुरवठा व कायमस्वरुपी देखभाल व संगोपनाची व्यवस्था.
४झाडांचे जिवंत राहण्याचे प्रमाण किमान ८० ते ९० टक्के राहील, या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे.
४प्रत्येक शाळेत किमान १० विद्यार्थ्यांचा गट स्थापन करून ‘पर्यावरण रक्षक सेना’ तयार करण्यात यावी त्यांना पर्यावरणाचे रक्षण, संवर्धन यासाठी प्रशिक्षण देणे.
‘वृक्षदिंडी’त द्यावा लागणार गोषवारा
‘वृक्षदिंडी’मध्ये मागील तीन वर्षांत किती झाडे लावलीत, त्यापैकी किती झाडे जगली याची माहिती वन व सामाजिक वनीकरण विभागाकडून संकलित केलेली माहिती योजनेमार्फत सादर करण्यात येणार आहे. ज्या शाळा वृक्षारोपण व त्यांचे संरक्षण, देखभाल अत्युत्तम करेल यासाठी बक्षीस योजना राबविली जात आहे. शासनाकडून वृक्षारोपणाचा अहवाल मागितल्याने केवळ वृक्षारोपण करून भागणार नाही तर लावलेली झाडे जगविण्याची जबाबदारी देखील सांभाळावी लागणार आहे.