लाभार्थ्यांच्या घरकुलासाठी प्लॉट सिलिंग आवश्यक
By Admin | Updated: May 7, 2016 00:48 IST2016-05-07T00:48:05+5:302016-05-07T00:48:05+5:30
पंतप्रधान घरकूल योजनेत घरकूल मिळावे, यासाठी अचलपूर नगरपरिषदेच्या कार्यालयात अर्ज भरण्यासाठी झुंबड उडाली आहे.

लाभार्थ्यांच्या घरकुलासाठी प्लॉट सिलिंग आवश्यक
हजारो भूखंड रिकामे : एकाची किंमत कोटीच्या घरात
अचलपूर : पंतप्रधान घरकूल योजनेत घरकूल मिळावे, यासाठी अचलपूर नगरपरिषदेच्या कार्यालयात अर्ज भरण्यासाठी झुंबड उडाली आहे. कित्येक लोकांना राहण्यासाठी घरे नसल्याने शासनाला पंतप्रधान आवास योजना राबवावी लागत आहे. दुसरीकडे जुळ्या शहरालगत सुपीक जमिनीवर भूखंड पाडून त्या अव्वाच्या सव्वा भावात विकल्या जात आहेत. त्यासाठी केंद्र सरकारने भूखंडाच्या (प्लॉट) सिलिंगचा अनेक वर्षांपासून रिक्त असलेले प्लॉट ताब्यात घेऊन त्यावर बेघरांना घरकूल बांधून द्यावे. त्यामुळे काही प्रमाणात आर्थिक समानता येऊन रिकाम्या जागांचा सदुपयोग होईल, अशी मागणी आहे.
अनेक अवैध व्यावसायिक, आयकर चुकविणारे, लाच घेऊन धनाढ्य झालेले काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अचलपूर-परतवाडा शहराला लागून मोठमोठे ३ ते ५ भूखंड अडकवले आहेत. यातील एकेका भूखंडाची किंमत एक कोटीच्या जवळपास आहे. बँकेत पैसा ठेवल्यास त्याची चौकशी होण्याची भीती असल्याने अनेकांनी शेती किंवा प्लॉट खरेदी करून आपला पैसा यात गुंतवणूक करून ठेवला आहे. काळ्या कसदार सुपीक जमिनीवर प्लॉट पाडण्यात आलेले आहेत. काही अधिन्यासाला परवानगी नसतानाही सपाट्याने विकले गेले आहेत. काहींची अजूनही विक्री सुरू आहे.
एखाद्या अवैध अधिन्यासाविषयी कुणी आवाज उचलल्यास किंवा अवैध मार्गाने पैसा जमा केलेल्या संबंधित अधिकारी किंवा व्यावसायिकांविरुद्ध आवाज उठविल्यास त्याचा आवाज साम, दाम, दंड हे तत्त्व वापत्रून संबंधितांनी बंद केल्याची घटना घडल्या आहेत. घरातील सदस्यांच्या नावावर एकाच मालकाचे अनेक असून एका कुटुंबाकडे किती फूट जागा असावी, हे शासनाने ठरवून द्यावे. त्याच्याकडे अतिरिक्त असलेल्या जागेचा शासकीय दराप्रमाणे मोबदला देऊन ते भूखंड ताब्यात घ्यावे व त्याच जागेवर गोरगरिबांची घरकुले बांधून ती घरे पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना वितरित करावे म्हणजे काहीअंशी आर्थिक समानता येऊन अवैध मार्गाने संपत्ती जमा करणाऱ्यांना धडा मिळेल, असे जनतेचे मत आहे. (शहर प्रतिनिधी)
गोरगरिबांकडे जागाही नाही, घर बांधणार कुठे ?
प्रधानमंत्री घरकूल आवास योजनेत ३३४ चौरस मीटर जागा घरकुलासाठी लागणार आहे. काही गोरगरिबांकडे जागाही नसल्याने त्यांनी घरकूल कुठे बांधावे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. रिकामे प्लॉट शासनाने ताब्यात घेऊन त्यावर घरकुले बांधल्यास अनेक प्रश्न मिटू शकतात असे मत माजी नगरसेवक माणिक देशपांडे, विनय चतूर, नितीन भुयार, संजय कोरे, अमोल गोहाड, सोमेश ठाकरे, बबल्या पोटे, सतीश आकोलकर, सचिन गणगणे, नंदू राऊत, प्रकाश महाजन यांचेसह आदींनी व्यक्त केले आहे.