खारपाणपट्ट्यातील शेती विकासासाठी आराखडा
By Admin | Updated: October 4, 2014 23:19 IST2014-10-04T23:19:35+5:302014-10-04T23:19:35+5:30
जिल्ह्यासह विदर्भातील खारपाणपट्ट्यातील शेतीचा शाश्वत विकास व्हावा या उद्देशाने या भागात करावयाच्या आवश्यक उपाययोजनांचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे.

खारपाणपट्ट्यातील शेती विकासासाठी आराखडा
अमरावती : जिल्ह्यासह विदर्भातील खारपाणपट्ट्यातील शेतीचा शाश्वत विकास व्हावा या उद्देशाने या भागात करावयाच्या आवश्यक उपाययोजनांचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ तसेच या भागात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांची मदत यासाठी घेण्यात येणार आहे.
अमरावती, अकोला व बुलडाणा या तीन जिल्ह्यांमध्ये खारपाणपट्टा आहे. या भागाचे वैशिष्ट्य म्हणजे पाण्याची मुबलकता असताना त्यामध्ये क्षाराचे प्रमाण अधिक आहे. परिणामी हे क्षारयुक्त पाणी शेतीसाठी वापरता येत नाही. या पाण्याचा मानवी आरोग्यावरदेखील परिणाम होतो.
या जमिनी बेसॉल्ट खडकापासून तयार झाल्याचा निष्कर्षही कृषी विद्यापीठ तज्ज्ञांनी नोंदविला आहे. पूर्व ते पश्चिम १५० किलोमीटर लांब आणि उत्तर ते दक्षिण ६० किलोमीटर रुंद असा हा खारपाण पट्टा विस्तारला आहे. अमरावती जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील ३५५ गावे, अकोला जिल्ह्यातील पाच तालुक्यातील ३७२ गावे, बुलडाणा जिल्ह्यातील पाच तालुक्यातील ८९४ गावे खारपाण पट्ट्यात आहेत. यामुळे ओलिताची शेती करणे शेतकऱ्यांना कठीण जाते.
अमरावती विभागाचे तत्कालीन कृषी सहसंचालक अशोक लोखंडे यांनी या भागातील शेतीला शाश्वत करण्याच्या उद्देशाने काय कामे आवश्यक आहेत त्याचा विस्तृत अहवाल शासनाकडे सादर केला.