‘प्लेग’ने उद्ध्वस्त वरूडा उजाडच!
By Admin | Updated: December 2, 2015 00:11 IST2015-12-02T00:11:29+5:302015-12-02T00:11:29+5:30
येथून एक किलोमीटर अंतरावर चहूबाजूंनी नटलेल्या निसर्गसौंदर्यात वरूडा गाव वसलेले होते.

‘प्लेग’ने उद्ध्वस्त वरूडा उजाडच!
शतकानंतरही पालटली नाही कळा : पडक्या भिंती, मंदिरे, विहिरींचे अवशेष शिल्लक
अमोल कोहळे पोहरा बंदी
येथून एक किलोमीटर अंतरावर चहूबाजूंनी नटलेल्या निसर्गसौंदर्यात वरूडा गाव वसलेले होते. सुमारे १०० वर्षांपूर्वी प्लेगची साथ आली आणि एकापाठोपाठ एक घराघरांतून माणसे दगावली. संपूर्ण गावाला प्लेगच्या साथीने वेढले होते तेव्हापासून उजाड झालेले हे गाव अद्यापही वसले नाही. या गावाचे इतरत्र कुठे पुनर्वसनही झाले नाही.
पोहरापासून जवळच असलेल्या घनदाट जंगल क्षेत्राला उजाड वरूडा म्हणून ओळखले जाते. जेथे आज जंगल आहे तेथे १०० वर्षांपूर्वी गाव वसले होते, याची तेथील काही पुरातन वस्तू साक्षी आहेत. ज्या जागी लोकांचे अस्तित्व होते, ती जागा वृक्षवल्ली प्राण्यांनी व्यापली आहे. पशुपक्षी गोड कंठाने दु:खी वरूडाचा इतिहास सांगत वरूडाच्या जखमेवर फुंकर मारण्याचा जणू प्रयत्न करीत असल्याचा भास निर्माण होतो.
१९ व्या शतकात ब्रिटिशांना देशातून परतवून लावण्यासाठी खेड्यात मशाली पेटल्या असताना त्याचवेळी महामारी व व प्लेगसारख्या रोगाने थैमान घालून अनेक गावांना पीडित करून सोडले होते, असे सांगितले जाते. उंदराच्या पाठीवर येणाऱ्या प्लेगच्या साथीला वरूडा गाव बळी पडल्याचे काही जाणकारांनी सांगितले. त्याकाळी प्लेगवर रामबाण औषधी उपलब्ध नव्हती. मग ज्या गावात प्लेग आला तेथील मंडळीला गाव रिकामा केल्याशिवाय पर्याय नसायचा. प्लेगची साथ १०० वर्षांपूर्वी वरूडा गावावर आल्याने येथील माणसांसह पाळीव प्राणीही नष्ट झाले. उजाड वरूडाला भेट दिली असता आजही हे गाव स्वकीयांना हरविल्याबद्दल अश्रू ढाळत असल्याचे जाणवते.
गावात थोड्याच अंतरावर पाटलाच्या वाड्याच्या पडक्या भिंती शेवटच्या घटका मोजत आहेत. वाड्यांच्या बाजूला एक मारूतीची मूर्ती उभी आहे. शेजारीच एक विहीर आहे. लोकांच्या सहवासात राहणारा हा हनुमान आजही निवांतपणे उभा असून येथे कधी तरी वरूडा नावाचे गाव होते याची साक्ष देत विराट घनदाट जंगलाचा पहारेदार बनलाय आजूबाजूला जमीनदोस्त झालेल्या घरांचे जोते (पायवे) आढळतात परिसराला वन विभागाने नवीन वनसंरक्षण कुटी तयार केली. आता वरूडा जंगल म्हणून ओळखले जात आहे. येथे उघड्यावर बजरंग बलीच्या मूर्ती आहे. येथे त्यांच्या मृत्यू पश्चात वनविभागाची वनसंरक्षण कुटी उभारण्यात आली आहे.
वरूडाच्या या पूर्वेतिहासाबद्दल आजूबाजूच्या गावातील ज्येष्ठ नागरिकांनीसुद्धा दुजोरा दिला. वन विभागाच्या नोंदीत वरूडा गाव आढळते. बजरंग मूर्ती विहीर व पडक्या अवस्थेतील वाडा वरूडा गावाचा ठोस पुरावा म्हणून समोर येतो.
तरोडा, वरूडा, ब्रह्मी, नवसारी ही गावे प्लेगच्या साथीने उजाड झाली होती. त्यावेळी या गावात एकामागे एक जीव मृत्यूमुखी पडत गेले. दिवसभर स्मशानात सकाळपासून संध्याकाळपर्यंत खड्डे करावे लागत होते. त्यावेळी या आजारावर कोणताच रामबाण ईलाज उपलब्ध नसल्याने लोक काळजी घेत. प्लेगची साथ पसरल्यानंतर कोणताही नातेवाईक भेटीला सुध्दा येत नसे. उदध्वस्त झालेल्या या गावाचे भाग्य अद्यापही उदयास आले नाही.
- मुरलीधर भालकर, (९०, रा. पोहरा बंदी), प्लेग साथीचे साक्षीदार.