कपाशीवर लाल्या
By Admin | Updated: September 18, 2014 23:26 IST2014-09-18T23:26:19+5:302014-09-18T23:26:19+5:30
जिल्ह्यात २ लाखांवर पेरणीक्षेत्र असणाऱ्या कपाशीवर, त्याही मध्यम स्वरूपाच्या जमिनीतील कपाशीवर प्रतिकूल हवामान व अन्नद्रव्याची कमतरता यामुळे कोकडा व लाल्या रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे.

कपाशीवर लाल्या
नवे संकट : प्रतिकूल हवामान, अन्नद्रव्यांची कमतरता
अमरावती : जिल्ह्यात २ लाखांवर पेरणीक्षेत्र असणाऱ्या कपाशीवर, त्याही मध्यम स्वरूपाच्या जमिनीतील कपाशीवर प्रतिकूल हवामान व अन्नद्रव्याची कमतरता यामुळे कोकडा व लाल्या रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. पाण्याचा निचरा न झालेल्या शेतामधील कपाशी पिवळी पडली आहे. आधीच दीड महिना उशिरा खरीप हंगाम सुरु झाला. त्यात आता रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. निसर्गाची अवकृपा व पावसाचा लहरीपणा यामुळे सरासरी उत्पन्नात घट होेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कपाशी व सोयाबीन पिकाने दगा देणे आता नित्याचेच झाले आहे. कमी खर्चाचे व अल्प कालावधीचे नगदी पीक या अर्थाने सोयाबीन पिकाला प्राधान्य दिले जाते. तरीही गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कापसाचा पेरा वाढला आहे. यंदाच्या हंगामात उशीरा पाऊस आल्याने पेरणीला उशीरच झाला. त्याचा परिणाम पिकांची उगवण शक्ती व नंतर पिकांच्या वाढीवर झाला. यातून कपाशी सावरत नाही तोच आता लाल्या रोगाचे संक्रमण झाल्याचे दिसून येते.
मध्यम पोत असणाऱ्या शेतांमधील कपाशीवर कोकड्या रोगाचे आक्रमण झाले आहे. याचे रूपांतर लाल्या रोगातही होत आहे. सद्यस्थितीत लाल्याचा प्रादुर्भाव होण्यास सुुरुवात झाली आहे. परंतु या पूर्वीच्या अनुभवामुळे शेतकरी धास्तावला आहे. रसशोषण करणाऱ्या किडींमुळे लाल्या रोग येत असल्याचे कृषीशास्त्रज्ञांनी सांगितले. काही दिवसांत या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागाने सांगितले.