महसूल यंत्रणा बुजवतेय पूर्णा नदीपात्रातील खड्डे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:07 IST2021-03-29T04:07:46+5:302021-03-29T04:07:46+5:30
२ कॉलम फोटोची जागा सोडा. फोटो येत आहे. पाच ट्रकवरील कारवाई गुलदस्त्यात, रेती माफियांचा राज, पडद्याआडचे संबंध दडपण्याचा खटाटोप ...

महसूल यंत्रणा बुजवतेय पूर्णा नदीपात्रातील खड्डे !
२ कॉलम फोटोची जागा सोडा. फोटो येत आहे.
पाच ट्रकवरील कारवाई गुलदस्त्यात, रेती माफियांचा राज, पडद्याआडचे संबंध दडपण्याचा खटाटोप
परतवाडा : पूर्णा नदीपात्रात वाळूमाफियांनी चोरून केलेले काही खड्डे महसूल यंत्रणेने जेसीबीने बुजविल्याची माहिती हाती आली आहे. प्रत्यक्षात त्या नदीपात्रात आजही मोठ्या प्रमाणात खड्डे जैसे थे आहेत. ‘लोकमत’ने रेती तस्करीवर प्रकाशझोत टाकल्याने रेती तस्करांशी असलेले अर्थपूर्ण संबंध उघड होऊ नयेत, यासाठी काही अधिकाऱ्यांनी हा खटाटोप चालविला आहे.
विशेष म्हणजे महसूल विभागाने पकडलेल्या पाच ट्रकवर दंडात्मक कारवाईची माहिती गुलदस्त्यात आहे. लांब अंतरावरील गावांचे नाव टाकून रॉयल्टी पास बनविली जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच वाळूमाफिया व महसुलातील काही हप्तेखोरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. रेतीघाट लिलावात घेतल्यानंतर दुसऱ्या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात उत्खनन करीत लाखो रुपयांची रेती चोरीला जात असल्याचा प्रकार उघड झाला. त्यानंतर महसूल प्रशासनाने गत आठवड्यापूर्वी पाच ट्रक ताब्यात घेतले. त्यावर दंडात्मक कारवाईची शिफारस कुठपर्यंत करण्यात आली, याची माहिती महसूल विभागाने अजूनपर्यंत जाहीर केली नाही. त्यामुळे अनेक चर्चांना पेव फुटले आहे. महसूल विभागातील काही हप्तावसुली प्रवृत्तीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांमुळे तर वाळूमाफियांचे फावले आहे. लाखो रुपयांचा महसूल बुडवून ते स्वत:च्या घशात घालत आहेत.
जेसीबीने खड्डे बुजविले, मोजमाप केव्हा?
भातकुली तालुक्यातील पोहरा पूर्णा परिसरातील रेतीघाटाचा लिलाव झाला. प्रत्यक्षात मात्र अचलपूर तालुक्यातील येलकी पूर्णा परिसरातून वाळूमाफियांनी शेकडो ब्रास रेती चोरून नेली. त्यामुळे पूर्णा नदीपात्रात १० ते १५ फूट पेक्षा अधिक खोल खड्डे आजही असल्याचे चित्र आहे. त्यातील काही खड्डे जेसीबीने बुजविल्याची माहिती आहे. प्रत्यक्षात महसूल प्रशासनाने असलेल्या खड्ड्यांचे मोजमाप करून चोरी करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक व फौजदारी कारवाई करणे अपेक्षित होते. परंतु आठवडा उलटूनसुद्धा अशी कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही, हे विशेष.
बॉक्स
‘लोकमत’च्या दणक्याने खळबळ
रेतीघाट संचालकांसह वाळूमाफिया मोठ्या प्रमाणात नियम पायदळी तुडवीत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करतात एकच खळबळ उडाली आहे. रेती विकत घेणाऱ्यास कुठल्याच प्रकारची पावती दिली जात नाही. लांब पल्ल्याचे अंतर दाखवून दिवसभर १३ हजार रुपयांत नऊ ब्रास रेती चोरून दोन ब्रास रेती नेल्याची रॉयल्टी बनविली जात असल्याचा प्रकार उघड होताच वाळूमाफियांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.