पोहरा जंगलात आढळले बिबट, हरिण
By Admin | Updated: March 6, 2016 23:59 IST2016-03-06T23:59:18+5:302016-03-06T23:59:18+5:30
पोहऱ्याच्या जंगलात पक्षी निरीक्षणादरम्यान निसर्गप्रेमींना प्रत्यक्ष बिबट्याचे दर्शन घडले. सोबतच हरिण, नीलगाय आणि मोरदेखील मुक्त संचार करताना आढळून आले.

पोहरा जंगलात आढळले बिबट, हरिण
अमरावती : पोहऱ्याच्या जंगलात पक्षी निरीक्षणादरम्यान निसर्गप्रेमींना प्रत्यक्ष बिबट्याचे दर्शन घडले. सोबतच हरिण, नीलगाय आणि मोरदेखील मुक्त संचार करताना आढळून आले. रविवारी सकाळी ६.३० वाजता पक्षिमित्र पोहऱ्याच्या जंगलात गेले असता त्यांना हा बिबट आहे. त्यावेळी बिबट्याचे दर्शन झाले.
वडाळी वनपरिक्षेत्रातील पोहरा वर्तुळात पाच ते सहा बिबट असून ते जंगलातील विविध भागात फिरताना अनेकदा वनविभाग व जंगलाशेजारच्या गावकऱ्यांना आढळून आले आहेत. त्यातच पोहरा जंगलात स्थलांतर करून आलेला पट्टेदार वाघसुध्दा वनविभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे जंगलात प्रवेश न करण्याचे आवाहन वनविभागाद्वारे वारंवार केले जाते. यावरून पोहऱ्याच्या जंगलात वन्यप्राण्यांचे वास्तव्य असल्याचे सिध्द होते. पक्षी निरीक्षण व वन्यप्राणी अवलोकनाच्या उद्देशाने अनेक पक्षिमित्र जंगलातून जाणाऱ्या मार्गाने भ्रमण करतात. रविवारी सकाळी काही पक्षिमित्र पोहरा मार्गावरील वाघामाता मंदिर परिसरात जंगलात निरीक्षण करीत असताना ५०० मीटर अंतरावर त्यांना बिबट मुक्त संचार करताना आढळला. त्यांनी शांतपणे एकाच ठिकाणी बसून धाडसाने बिबट्याची छायाचित्रे ेकाढली. काही वेळात बिबट तेथून निघून गेला. थोड्याच वेळाने जंगलातील पाणवठ्यावर पाणी पिताना तहानलेला बिबटदेखील आढळून आला. या भ्रमंतीदरम्यान पक्षिमित्रांच्या कॅमेऱ्यात हरिण, मोर, काळवीट, निलगायदेखील कैद झाली आहेत. यापूर्वीसुध्दा पोहरा वनवर्तुळात बिबट्याचे पगमार्क आणि विष्ठा आढळून आल्याने या भागात बिबट असल्याची माहिती होती. ती आता खरी ठरली आहे. (प्रतिनिधी)