महामार्गावरील खड्डा ठरतोय मृत्यूचा सापळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 05:00 IST2020-10-11T05:00:00+5:302020-10-11T05:00:25+5:30
नागपूर-औरंगाबाद सुपर एक्सप्रेस हायवे राज्य रस्ते विकास महामंडळाकडे होता. एक वर्षापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विशेष प्रकल्प विभागाकडे तो आला. न्यायालयीन निर्णयानंतर गत दिवाळीत तो भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे सुपूर्द करण्यात आला. त्यावर तळेगाव दशासरपासून पश्चिमेकडे जाणाऱ्या अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर एक खड्डा आहे. दर महिन्यात येथे कधी ट्रक पलटी होतात, तर कधी दुचाकीचा अपघात होतो.

महामार्गावरील खड्डा ठरतोय मृत्यूचा सापळा
मोहन राऊत।
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : रस्ते तयार केल्यानंतर खड्डे पडण्याचा अनुभव नवा नाही. मात्र, काही खड्डे हमखास प्राणहानीला कारणीभूत ठरतात. नागपूर-औरंगाबाद सुपर एक्स्प्रेस हायवेवर एका खड्ड्यात जडवाहने पलटी होण्याच्या घटना घडत आहेत. आतापर्यंत या एकाच खड्ड्याने तब्बल आठ जणांचे बळी घेतल्याचे वास्तव आहे.
नागपूर-औरंगाबाद सुपर एक्सप्रेस हायवे राज्य रस्ते विकास महामंडळाकडे होता. एक वर्षापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विशेष प्रकल्प विभागाकडे तो आला. न्यायालयीन निर्णयानंतर गत दिवाळीत तो भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे सुपूर्द करण्यात आला. त्यावर तळेगाव दशासरपासून पश्चिमेकडे जाणाऱ्या अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर एक खड्डा आहे. दर महिन्यात येथे कधी ट्रक पलटी होतात, तर कधी दुचाकीचा अपघात होतो. आतापर्यंत या खड्ड्यात आठ लोकांचा बळी गेला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विशेष प्रकल्प विभागाने हा खड्डा एक वर्षात अनेक वेळा दुरुस्त केला. सुपर एक्सप्रेस हायवेची दुरुस्ती केल्यानंतर किमान एक वर्ष तरी रस्त्याची स्थिती चांगली राहते. मात्र, खड्डा नियमित दुरुस्त करूनही लगेच आठ दिवसांत गुडघाभर खोल जातो. बांधकाम विशेष प्रकल्पाचे अधिकारीही या खड्ड्यामुळे हतबल झाले आहेत.
अपघाताच्या घटनांत वाढ
घुईखेड मार्गावरून तळेगाव दशासरकडे येताना नागमोडी वळणावर समांतर जागेत तो खड्डा आहे. बहुतांश जड वाहने येथे उलटून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. खड्ड्यात पडल्यामुळे डोक्याला दुखापत होऊन अनेकांना जीव गमवावा लागला. दरवर्षी तेथे तीन ते चार अपघात होतात. त्यात काही जखमी, तर काहींचा मृत्यू झाला.
खड्डा आम्ही दुरुस्त केला. हा सुपर एक्स्प्रेस हायवे आता राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. दुरुस्तीची कामे तेच करतात.
- प्रमोद कोहळे, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, चांदूर
- तर हा खड्डाही नसता
तळेगाव दशासर ते निमगव्हाण हा पूर्वीचा पांदण रस्ता होता. त्या काळात या घुटकी नाल्याजवळ दलदल होती. त्यावेळीही पावसाळ्यात या रस्त्याने जाताना अनेकांचा जीव गेल्याचे ग्रामस्थ सांगतात. काळ्या मातीची खोलवट जागा असल्याने हा खड्डा नेहमी तयार होतो. यंत्रणेने दखल घेतली असती, तर हा खड्डा तयार झाला नसता, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.