मिनीमहापौरांच्या पुत्राजवळून पिस्टल जप्त
By Admin | Updated: January 17, 2015 00:52 IST2015-01-17T00:52:50+5:302015-01-17T00:52:50+5:30
वलगाव मार्गावरील हबिब नगरातून गुरुवारी रात्री १०.३० वाजता मिनी महापौर हाफिजाबी यांच्या मुलाजवळून गुन्हे शाखेच्या पथकाने एका पिस्टलसह दोन जिवंत काडतूस जप्त करुन अटक केली.

मिनीमहापौरांच्या पुत्राजवळून पिस्टल जप्त
अमरावती : वलगाव मार्गावरील हबिब नगरातून गुरुवारी रात्री १०.३० वाजता मिनी महापौर हाफिजाबी यांच्या मुलाजवळून गुन्हे शाखेच्या पथकाने एका पिस्टलसह दोन जिवंत काडतूस जप्त करुन अटक केली. फिरोज शाह ऊर्फ भुऱ्या युसूफ शहा (२८,रा. हबीबनगर) असे, आरोपीचे नाव आहे.
काही वर्षांपासून शहरात देशी कट्टयाचे चलन असल्याचे आढळून आले आहे. अनेक गुन्हेगार सर्रासपणे देशी कट्टयाचा वापर करुन दहशत पसरवीत आहेत. त्यातच गोळीबार झाल्याच्या काही घटना उघडकीस आल्या आहेत. आता पोलीस विभाग सतर्क झाले असून देशी कट्टे व पिस्टल बाळगणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. दीड महिन्यांपूर्वी चांदणी चौकात झालेला गोळीबार तसेच नुकताच गुलिस्तानगरात आरीफ लेंड्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात गोळ्या झाडण्यात आल्या. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रियाजुद्दीन देशमुख यांच्या मार्गदर्शनात एपीआय रवी राठोड, राजेश राठोड, किशोर महाजन नीळाकंठ चव्हाण, नागपुरी गेटचे पीआय गावंडे यांच्या पथकाने गुप्त माहितीवरुन गुरुवारी हबीबनगर नं १ चौकात पाळत ठेवून फिरोज शाहला ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)
नगरसेविका हाफिजाबीविरुध्द गुन्हे दाखल
पोलीससूत्रानुसार फिरोजला अटक करण्यासाठी घेराव घातला होता. त्यावेळी नगरसेविका हाफिजा बी यांच्यासह २० ते २५ जणांनी विरोध दर्शविला होता. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. यावेळी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रियाजुद्दीन देशमुख यांनी सरकारी पिस्तुलाचा धाक दाखविल्याने फिरोजच्या समर्थकांनी पलायन केले. या कारवाईत अडथळा निर्माण करणाऱ्या नगरसेविका हाफिजाबी यांच्यासह २० जणांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले.