पाईपलाईन लिकेज, दूषित पाणीपुरवठा
By Admin | Updated: January 7, 2017 00:19 IST2017-01-07T00:19:26+5:302017-01-07T00:19:26+5:30
तालुक्यातील ममदापूर येथे काही वर्षांपूर्वी टाकलेल्या पाईपलाइनला ठिकठिकाणी व थेट गटारात लिकेज आहेत.

पाईपलाईन लिकेज, दूषित पाणीपुरवठा
जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार : आरोग्याला धोका, कारवाईची मागणी
तिवसा : तालुक्यातील ममदापूर येथे काही वर्षांपूर्वी टाकलेल्या पाईपलाइनला ठिकठिकाणी व थेट गटारात लिकेज आहेत. त्यामुळे नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी ग्रा.पं. सदस्य मुकुंद पुनसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारीद्वारे केली आहे.
वणी ममदापूर ग्रा.पं.चे सदस्य मुकुंद पुनसे यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित तालुका प्रशासनाकडे तक्रार सादर केली आहे. ग्राम ममदापूर येथे पाणीपुरवठा योजने अंतर्गत सन २००७ ते २०१२ मध्ये पाईपलाईनचे काम करण्यात आले होते. यावेळी सरपंच, सदस्य व सचिव यांनी कामाकडे दुर्लक्ष केल्याने संबंधित ठेकेदाराने सदर पाईपलाईनचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केले. त्यामुळे वारंवार पाईपलाईन लिकेज होत आहे. नागरिकांपर्यंत पाणी सुरळीत पोहोचत नाही, तर दुसरीकडे ही पाईपलाईन ग्रामपंचायतीच्या एका नालीमधून टाकण्यात आल्याने व पाईपलाईन लिकेज झाल्याने थेट नागरिकांपर्यंत पोहोचत आहे. नागरिकांना हेच दूषित पाणी पिण्यासाठी वापरावे लागत असल्याची खंत मुकुंद पुनसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारीद्वारे केली आहे.
दूषित पाणीपुरवठ्यामुळे गावात साथीचे आजार उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले असून ग्रामपंचायतीनेदेखील लिकेज पाईपलाईनचे काम करण्याचा ठरावही घेतला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मात्र, अद्याप लिकेज पाईपलाईनबाबत कुठलीच दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे प्रशासनाने याची चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी तक्रारीतून केली आहे. पाईपलाईन टाकण्याच्या कामाकडे आजी-माजी सरपंचांचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप सुद्धा पुनसे यांनी तक्रारीतून केला असून याबाबत सरपंचांशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. (तालुका प्रतिनिधी)
साथरोगाचा प्रादुर्भाव
दूषित पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांना साथरोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोटाचे तसेच अन्य विकारही या पाण्यामुळे संभवतो. गावकऱ्यांना या पाण्यामुळे आजाराची बाधा झाल्यास जबाबदार कोण, असा सवालही उपस्थित केला जात आहे.