जलपर्णीने रोखला पिंगळेचा प्रवाह
By Admin | Updated: February 26, 2016 00:32 IST2016-02-26T00:32:54+5:302016-02-26T00:32:54+5:30
येथील पिंगळा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर जलपर्णी वाढली असल्याने पिंगळा नदी प्रदूषित झाली आहे.

जलपर्णीने रोखला पिंगळेचा प्रवाह
सांडपाण्यामुळे पाणी प्रदूषित : कचरा पात्रात, नागरिकांचे आरोग्य धोक्यात
तिवसा : येथील पिंगळा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर जलपर्णी वाढली असल्याने पिंगळा नदी प्रदूषित झाली आहे. तसेच गावातील सांडपाणी, कचरादेखील याच नदीत टाकण्यात येत असल्याने हे पाणी आरोग्यासाठी घातक आहे. जलशिवारच्या कामात नदीची सफाई व खोलीकरणानंतर नदीचा कायापालट होणार आहे.
यंदा अपुऱ्या पावसामुळे नदी-नाले प्रवाहित नाही त्यामुळे नदीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर जलपर्णी वाढली आहे. तसेच नदीकाठालगत बेशरमशी झुडपे आहेत व नदीकाठालगत असलेल्या आठवडी बाजारातील कचरा व गावातील सांडपाणी या नदीत टाकला जात असल्याने हे पाणी आरोग्यासाठी व गुरांना पिण्यासाठी घातक ठरू लागले आहे.
स्थानिक नगरपंचायतींनी या विषयाला गांभीर्याने घेऊन कचरा कंपोष्ट डेपोत टाकणे व गावातील सांडपाण्याची पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे. जलशिवारमध्ये या कामाचा समावेश करून हा प्रश्न निकाली काढावा, अशी नागरिकांची मागणी आहे. (प्रतिनिधी)