पीआय भगत नियंत्रण कक्षात, पोलीस निलंबित
By Admin | Updated: May 19, 2016 00:06 IST2016-05-19T00:06:05+5:302016-05-19T00:06:05+5:30
पोलीस आयुक्तांच्या आदेशाने राजापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवा भगत यांना पोलीस नियंत्रण कक्षात अटॅच करण्यात आले असून ...

पीआय भगत नियंत्रण कक्षात, पोलीस निलंबित
आयुक्तांचे आदेश : पोलीस विभागात खळबळ
अमरावती : पोलीस आयुक्तांच्या आदेशाने राजापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवा भगत यांना पोलीस नियंत्रण कक्षात अटॅच करण्यात आले असून अवघ्या एक दिवसापूर्वी स्थानांतरण केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
राजापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवा भगत यांनी पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यासंदर्भात पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्याकडे विनंती अर्ज सादर केला होता. त्यामुळे त्यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे. अकोला एटीएसमध्ये पाच वर्षांपासून कार्यरत पोलीस कर्मचारी राजू खिलवाडे सोमवारी पोलीस आयुक्तालयात हजर झाले होते.
त्यावेळी पोलीस आयुक्त रजेवर असल्याने खिलवाडे प्रभारी पोलीस आयुक्त नितीन पवार यांच्या समक्ष उपस्थित झाले. पवार यांच्या आदेशाने खिलवाडेंचे गुन्हे शाखेत स्थानांतरण करण्यात आले.
मंगळवारी खिलवाडे गुन्हे शाखेत रुजू झाले. मात्र, बुधवारी पोलीस आयुक्तांनी खिलवाडे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.
खिलवाडे अकोला येथे कार्यरत होते. त्यावेळी पोलीस उपायुक्त नितीन पवार हे सुध्दा अकोल्यात होते. त्यामुळे पवार व खिलवाडे यांचा परिचय होता. त्यांची विनंती बदली करण्यात आली होती. गुन्हे शाखेत चपळ पोलिसांना घेण्यात येते, खिलवाडे यांनी चुकीची माहिती देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल केल्याचे पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. या कारवाईमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)
विनंती बदली अर्जावरून पीआय शिवा भगत यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली तर खिलवाडे या पोलीस कर्मचाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करून गुन्हेशाखेत बदली करून घेतली. त्यामुळे त्याला निलंबित केले आहे.
- दत्तात्रेय मंडलिक,
पोलीस आयुक्त