महिलेची छायाचित्रे माॅर्फ, परिचितांमध्ये केली व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:12 IST2021-04-12T04:12:17+5:302021-04-12T04:12:17+5:30
फेसबूकवरून ओळखीचा गैरफायदा : अज्ञात आरोपीविरुद्ध नोंदविला गुन्हा अमरावती : फेसबूकवर मैत्रिणीचे बनावट अकाऊंट तयार करून महिलेशी मैत्री संपादन ...

महिलेची छायाचित्रे माॅर्फ, परिचितांमध्ये केली व्हायरल
फेसबूकवरून ओळखीचा गैरफायदा : अज्ञात आरोपीविरुद्ध नोंदविला गुन्हा
अमरावती : फेसबूकवर मैत्रिणीचे बनावट अकाऊंट तयार करून महिलेशी मैत्री संपादन केल्यानंतर तिची चित्रे अज्ञात युवकाने मॉर्फ केल्याची जिल्ह्यातील एका तालुक्यात उघडकीस आली. मुलीशी बोलत असल्याचे भासवून मिळविलेली काही छायाचित्रे तिच्या परिचितांना व्हायरल करून पैशांसाठी ब्लॅकमेल करण्यात आले. या प्रकरणाचा गुन्हा ग्रामीण सायबर सेलकडे वर्ग करण्यात आला आहे.
माहितीनुसार, मैत्रिणीच्या नावे फेसबूक अकाऊंटवरून महिलेला फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. त्यामध्ये मालेगाव (नाशिक) हे वास्तव्याचे ठिकाण दाखविण्यात आले होते. जवळची मैत्रिण असल्याने ती त्यांनी ॲक्सेप्ट केली. दैनंदिन व्यवहारापासून चॅटिंग सुरू केल्यानंतर महिलेने आयुष्याच्या आतापर्यंतच्या प्रवासातील गोष्टी तसेच वैवाहिक जीवनातील बाबी उघड करताना हे अकाऊंट फेक असावे, असा संशयही महिलेला आला नाही. एके दिवशी महिलेने तिच्या मैत्रिणीलाच थेट कॉल केला. अकाऊंटबाबत विचारले असता, मैत्रिणीने असे कुठलेही अकाऊंट नसल्याचे सांगितले. हादरलेल्या महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली.
----------------
मैत्रिण नव्हे अनोळखी पुरुष
मैत्रिणीने अकाऊंट नसल्याचे सांगितल्यानंतर महिलेने शहानिशा केली तेव्हा दररोज चॅटिंग करणारा हा पुरुष असल्याचे समजले. मात्र, तोपर्यंत जाळे घट्ट विणले गेले होते. मॉर्फ केलेले अश्लील व्हिडीओ माझ्याकडे आहेत. त्यातून होणारी बदनामी टाळायची असल्यास पैसे हवेत, अशी मागणी त्याने टाकली.
३५ जणांना पाठविला व्हिडीओ
महिलेने पैसे नसल्याचे सांगताच त्यातील काही व्हिडीओ, छायाचित्रे तिच्या फ्रेन्डलिस्टमधील ३५ जणांना त्याने पाठविले. अन्याय झाल्याची तक्रार देण्याकरिता जिल्ह्यातील एका ग्रामीण ठाण्यात महिलेने पतीसह धाव घेतली. मात्र, पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली नाही, उलट तुम्हीच आम्हाला यासंदर्भाची माहिती आणून द्या, असे सांगितले.
पोस्टनंतर घेतली पोलिसांनी दखल
महिलेने माहेरी अकोला जिल्ह्यात भावाला फसवणुकीचा प्रकार कथन केला. त्यांनी ही बाब एका वरिष्ठ पत्रकाराला सांगितली. पोलीस दखल घेत नसल्याने त्यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली. त्यानंतर पोलिसांनी दखल घेऊन अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ६६ ई ६७ आयटी ॲक्टनुसार गुन्हा नोंदवून तो तपासाकरिता ग्रामीण सायबर सेलकडे वर्ग केला आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तथा सायबर सेलेचे प्रभारी पोलीस निरीक्षक तपन कोल्हे करीत आहेत.
कोट
याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाकरिता सायबर सेलकडे वर्ग केला. महिलेचा फोटो मॉर्फ करून तो महिलेच्या ३५ फेसबूक फ्रेन्डना पाठविण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. आरोपी अज्ञात आहे. याचा प्रकरणाचा तांत्रिक तपास करून या घटनेचा छडा लावू.
- तपन कोल्हे, प्रभारी पोलीस निरीक्षक, सायबर सेल (ग्रामीण)