महापुरुषांचा अपमान करणारा 'फोटो व्हायरल'
By Admin | Updated: March 10, 2017 00:27 IST2017-03-10T00:27:58+5:302017-03-10T00:27:58+5:30
तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथे एका सातवीच्या विद्यार्थ्याने एका महापुरुषाचा अपमान करणारे छायाचित्र व्हॉट्सअॅपवर टाकले.

महापुरुषांचा अपमान करणारा 'फोटो व्हायरल'
तणावपूर्ण शांतता : वाठोड्यातील घटना
भातुकली : तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथे एका सातवीच्या विद्यार्थ्याने एका महापुरुषाचा अपमान करणारे छायाचित्र व्हॉट्सअॅपवर टाकले. यामुळे एका समुदायाच्या अनुयायांनी यावर तीव्र आक्षेप नोंदविला आहे. याप्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आल्याने पोलिसांनी गावात बंदोबस्त लावला असून येथे तणावपूर्ण शांतता आहे.
प्राप्त माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी इयत्ता सातवीत शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याने त्याच्या मोबाईलवरील व्हॉट्सअॅपद्वारे एका महापुरुषांचा फोटो आक्षेपार्ह पद्धतीने एडिट करून इतर मोबाईलवर व्हायरल करण्याचा प्रयत्न केला. ते छायाचित्र संबंधित समाजाच्या व्यक्तींच्या मोबाईवर सिल्याने त्यांनी इतरांना त्याची माहिती देऊन झालेला प्रकार निंदनीय असल्याचे कथन केले. या प्रकारामुळे एका विशिष्ट समुदायातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली. समाजबांधवांमध्ये उद्रेक निर्माण झाला. काही नागरिकांनी गावात तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. व्हॉट्सअॅपवर छायाचित्र टाकणाऱ्या मुलाच्या घरावर चालून जाण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच गावात पोलिसांचा ताफा दाखल झाला. बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलीस तुकडी गावात तैनात करण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलीस सूत्राद्वारे सांगण्यात येत आहे. दरम्यान गावातील परिस्थिती पाहता छायाचित्र व्हायरल करणारा मुलगा व त्याच्या कुुटुंबीयांनी गावातून पळ काढला. भातुकलीचे तहसीलदार व विभागीय पोलीस अधिकारी स्थितीवर लक्ष ठेवून आहेत. याप्रकरणी खोलापूर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला असून गावात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. दरम्यान कमलाताई गवई व भदंत वानखडे यांनी गावाला भेट देऊन नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. (तालुका प्रतिनिधी)