पीएच.डी. एम.फिल. मिळविण्यात ‘रसायनशास्त्र’, ‘इंग्रजी’ आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:12 IST2021-03-24T04:12:58+5:302021-03-24T04:12:58+5:30
पाच वर्षांत २१३३ संशोधक विद्यार्थ्यांचे प्रबंध, ऑनलाईन तोंडी परीक्षेने वेळेची झाली बचत गणेश वासनिक अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती ...

पीएच.डी. एम.फिल. मिळविण्यात ‘रसायनशास्त्र’, ‘इंग्रजी’ आघाडीवर
पाच वर्षांत २१३३ संशोधक विद्यार्थ्यांचे प्रबंध, ऑनलाईन तोंडी परीक्षेने वेळेची झाली बचत
गणेश वासनिक
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात पाच वर्षांत पीएच.डी., आणि एम.फिल. अभ्यासक्रमाच्या २१३३ संशोधक विद्यार्थ्यांनी शिक्षण आणि संशोधन मंडळ (बीयूटीआर) कडे प्रबंध सादर केले आहेत. त्यापैकी १८२१ विद्यार्थ्यांची ऑनलाईन तोंडी परीक्षा (व्हायवा) झाली असून, ३१२ विद्यार्थ्यांना या परीक्षेची प्रतीक्षा लागली आहे. संशोधनासह प्रबंध सादर करून पीएच.डी. एम.फिल. पदवी मिळविण्यात रसायनशास्त्र, इंग्रजी विभागाचे विद्यार्थी आघाडीवर आहेत.
विद्यापीठात १२ मार्च रोजी झालेल्या अधिसभेत एम.फिल., पीएच.डी.धारकांची संख्या, ऑनलाईन तोंडी परीक्षेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. विज्ञान व तंत्रज्ञान, मानव्य विज्ञान, आंतरविद्याशाखा, वाणिज्य व व्यवस्थापन अशा चारही शाखांमधून २१३३ विद्यार्थ्यांनी ३ मार्च २०१६ ते २२ मार्च २०२१ या कालावधीत त्यांचे प्रबंध विद्यापीठाच्या पीएच.डी. सेलकडे सादर केले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक ३४७ प्रबंध रसायनशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांचे आहेत. त्यापाठोपाठ इंग्रजी विभागातील २२१, अर्थशास्त्र विभागातील १९५, मराठीचे १५६, तर शारीरिक शिक्षण विभागातील १०७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. बायोटेक्नॉलॉजी, प्राणिशास्त्र, कम्प्यूटर ॲप्लिकेशन, राज्यशास्त्र अशा विविध ३५ विभागांतील एकूण ३१२ विद्यार्थ्यांच्या तोंडी परीक्षा अद्याप झालेली नाही. त्यामध्ये सर्वाधिक २३ विद्यार्थी फार्मसीचे, रसायनशास्त्राचे १४, तर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगचे नऊ विद्यार्थी आहेत. संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. मात्र, प्रबंध सादर करण्यापासून ते तोंडी परीक्षेचा कालावधी कमी करणे विद्यार्थिहितासाठी आवश्यक आहे.
----------------------
विद्याशाखानिहाय पाच वर्षांतील पीएच.डी.धारक
- विज्ञान व तंत्रज्ञान - ९२५
- मानव्य विज्ञान - ५३७
- आंतरविद्या शाखा - ४१०
- वाणिज्य व व्यवस्थापन - २६१
-------------
यावर्षीपासून ऑनलाईन तोंडी परीक्षा घेण्यात आल्यामुळे संशोधन विद्यार्थ्यांना याचा लाभ झाला आहे. बसल्या जागेवरून ऑनलाईन व्हायवा झाला. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) नियमानुसार वेळेत तोंडी परीक्षा घेण्याची कार्यवाही विद्यापीठाने केली आहे.
- प्रफुल्ल गवई, सदस्य, व्यवस्थापन परिषद.
-----------------
ऑनलाईन व्हायवामुळे वेळ, प्रवास वाचला
- प्रबंध सादर केल्यानंतर वेळेत ऑनलाईन तोंडी परीक्षा झाल्यामुळे काहीही अडचण झाली नाही, असे संशोधक विद्यार्थी भूपेश मुळे यांनी सांगितले. यूजीसीच्या नियमानुसार प्रबंध सादर केल्यानंतर झूम मीटिंगद्वारे ऑनलाईन व्हायवा सादर करण्यात आला.
---------------
- पीएच.डी. परीक्षांसाठी अन्य तज्ज्ञ प्राध्यापकांचे चांगले सहकार्य मिळाले. स्वीकारपत्र लवकरच प्राप्त झाले. ऑनलाईन व्हायवामुळे काहीही अडचणी आल्या नाहीत, असे संशोधक विद्यार्थिनी मृणालिनी देशमुख यांनी सांगितले.