पीएच.डी. कोर्सवर्क परीक्षा ‘एमसीक्यू’ पद्धतीनेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:14 IST2021-03-16T04:14:06+5:302021-03-16T04:14:06+5:30
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची पीएच.डी. कोर्सवर्क परीक्षा बहुपर्यायी प्रश्नावलीद्वारे (एमसीक्यू) होणार आहे. येत्या १५ दिवसांत महाविद्यालय स्तरावर ...

पीएच.डी. कोर्सवर्क परीक्षा ‘एमसीक्यू’ पद्धतीनेच
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची पीएच.डी. कोर्सवर्क परीक्षा बहुपर्यायी प्रश्नावलीद्वारे (एमसीक्यू) होणार आहे. येत्या १५ दिवसांत महाविद्यालय स्तरावर या परीक्षांचे नियोजन केले जाणार असून, परीक्षेच्या अनुषंगाने ऑनलाईन पेपर सेटिंग पूर्णत्वास आले आहे.
डिसेंबर २०१९ मध्ये पीएच.डी. संशाेधकांनी संशोधनस्थळावर प्रवेश घेतले आणि त्यांचा कोर्सवर्क ऑनलाईन पद्धतीने २०२० मध्ये पूर्ण झाला. मध्यंतरी कोरोना संसर्गामुळे विद्यापीठाचे कामकाज रेंगाळले. अनेक विभागांत अधिकारी, कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे परीक्षा विभागात आजमितीला १५ टक्के कर्मचाऱ्यांच्या भरवशावर कामकाज सुरू आहे. परंतु, राज्य शासन एमपीएसीची परीक्षा केंद्रावर घेऊ शकते, तर पीएच.डी. कोर्सवर्क परीक्षा का नाही? त्यामुळे विद्यापीठाने पीएच.डी. कोर्सवर्क परीक्षा ‘एमसीक्यू’पद्धतीने घेण्याबाबत नियोजन चालविले आहे. त्यामुळे आता रखडलेली पीएच.डी. कोर्सवर्कची परीक्षा झाल्यानंतर निकाल, आराखडा सादर करणे, प्रत्यक्ष अथवा ऑनलाईन मुुलाखती आणि नोंदणी असा प्रवास लवकरच सुरू होणार आहे.
-----------------
संशोधन केंद्रावर ऑफलाईन परीक्षा घेण्यात याव्या
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे विद्यार्थी ज्या संशोधन केंद्रावर प्रवेशित आहेत, त्यांची परीक्षा त्याच संशोधन केंद्राने घेऊन तातडीने गुण पाठवल्यास तातडीने निकाल लागू शकेल. इतर सर्व पारंपरिक परीक्षा जर महाविद्यालय स्तरावर घेता येऊ शकतात, तर कोर्सवर्कच्या परीक्षेला वेगळा नियम का, असा सवाल पीएचडी संशोधकांचा आहे. सदर परीक्षा तातडीने संशोधन केंद्रावर ऑफलाईन पद्धतीने घेऊन निकाल लावावा आणि हजारो विद्यार्थ्यांच्या संशोधनाचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
------------------
पीएचडी कोर्सवर्क परीक्षेसाठी पाचही जिल्ह्यातून सुमारे १५०० विद्यार्थी आहेत. एमसीक्यू पद्धतीनेच ही परीक्षा महाविद्यालय स्तरावर घेण्यात येणार आहे. १५ दिवसात परीक्षेचे वेळापत्रक जाहीर होईल.
- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ.